मुलींचीच सरशी!

By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30

राज्याचा दहावीचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने जाहीर झाला असून, यंदा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के लागला

Girls! | मुलींचीच सरशी!

मुलींचीच सरशी!

Next


पुणे : राज्याचा दहावीचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने जाहीर झाला असून, यंदा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या निकालातही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी ३.४३ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.९० टक्क्यांनी निकालात घट झाली आहे. विभागीय मंडळात कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.५६ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ८१.५४ टक्के आहे. ३ हजार ९७४ शाळांचा निकाल १०० टक्के तर ६१ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत १ ते २९ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आली. १६ लाख ७ हजार ४११ विद्यार्थ्यांपैकी १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मार्च २०१६च्या दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा येत्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे निकालात १.९० टक्क्यांनी घट झाली, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)
>९१ विद्यार्थी काठावर पास
उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी राज्यभरातील
९१ विद्यार्थी काठावर पास झाले असून, त्यांना सर्व विषयांमध्ये १००पैकी प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत.
>सिंधुदुर्ग अव्वल तर नांदेड सर्वांत खाली
मागील वर्षी दहावी-बारावीच्या निकालाचे सर्व विक्रम मोडीत निघाले होते. मात्र, यंदा निकालात घट झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वांत जास्त ९७.४७ टक्के लागला असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल सर्वांत कमी ७४.४८ टक्के आहे.
विद्यार्थिनींचा एकूण
निकाल ९१.४१ टक्के
असून, विद्यार्थ्यांचा निकाल ८७.९८ टक्के लागला
आहे. राज्यातील अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८८.७३ टक्के लागला आहे. मंडळातर्फे ५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली; त्यात १० विषयांचा निकाल १०० टक्के आहे.
राज्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी
४ लाख ४ हजार ७९४ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत तर ५ लाख ६१ हजार ७८६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७४ हजार ५१८ आहे. परीक्षेतील गैरप्रकारासह विविध कारणांमुळे राज्यातील ४२७ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.
मुंबईच्या निकालात एक टक्क्याने घट
दहावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरला आहे. गेल्या वर्षी ९२.९० टक्के निकालावर झेपावलेल्या मुंबई विभागाला यंदा ९१.९० टक्के निकालावर समाधान मानावे लागले. मात्र राज्यातील नऊ विभागीय मंडळांतील चौथे स्थान मुंबईने कायम राखले आहे. ९१.९० टक्के निकालात मुलींचे प्रमाण ९३.०७ टक्के असून, मुलांचे प्रमाण ९०.८३ टक्के एवढे आहे.

Web Title: Girls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.