बारावी टॉपर्समध्ये आवाज मुलींचाच
By admin | Published: June 4, 2016 12:45 AM2016-06-04T00:45:14+5:302016-06-04T00:45:14+5:30
बारावी उत्तीर्णांमध्ये मुलांना मागे टाकणाऱ्या मुली पुरस्कारांसह बहुतेक महाविद्यालयांमध्येही टॉपर्स ठरल्या आहेत. राज्य मंडळाच्या पुणे विभागाच्या एकूण २३ पुरस्कारांपैकी १९ पुरस्कार मुलींना मिळाले
पुणे : बारावी उत्तीर्णांमध्ये मुलांना मागे टाकणाऱ्या मुली पुरस्कारांसह बहुतेक महाविद्यालयांमध्येही टॉपर्स ठरल्या आहेत. राज्य मंडळाच्या पुणे विभागाच्या एकूण २३ पुरस्कारांपैकी १९ पुरस्कार मुलींना मिळाले आहेत. तर फर्ग्युसन, स.प., गरवारे यांसह विविध महाविद्यालयांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे.
मागील काही वर्षांपासून बारावीच्या निकालावर मुलींचेच वर्चस्व राहिले आहे. ही परंपरा यंदाही कायम राहिली आहे. आॅनलाईन निकालानंतर शुक्रवारी विद्यार्थ्यांना संबंंधित महाविद्यालयांमध्ये मूळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दुपारी तीन वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. निकालाच्या आनंदाने महाविद्यालयांचा परिसर फुलून गेला होता.
महाविद्यालयांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे रंगले होते. यामध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय दिसून आले. फर्ग्युसन, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य, स. प., गरवारे महाविद्यालयासह बहुतेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. क्वचित एखाद्या शाखेत मुलांचा क्रमांक असल्याचे दिसले. त्यामुळे कौतुक सोहळ््यांवर मुलींचा दबदबा राहिला.
राज्य मंडळाच्या पुणे विभागाने विविध विषयांसाठी जाहीर केलेल्या पुरस्कारांवर मुलींनीच बाजी
मारली आहे. एकूण २३ पुरस्कारांपैकी १९ पुरस्कार पुण्यासह सोलापूर
व अहमदनगर जिल्ह्यातील
मुलींनी मिळविले आहेत. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमध्ये शुक्रवारी मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य अधिक फुलले होते. (प्रतिनिधी)
वयाच्या ४६व्या वर्षी बारावी उत्तीर्ण
‘माणूस शरीराने वृद्ध होतो, मनाने नाही. वय झाले म्हणून शिक्षण बंद करणे चुकीचे आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी नाही तर मुलांवर व नातवंडांवर संस्कार करण्यासाठी होऊ शकतो’, असा विचार करून कसबा पेठेतील उषा खुडे यांनी वयाच्या ४६व्या वर्षी बारावीची परीक्षा देवून ५५ टक्के गुण मिळवले.
स. प. महाविद्यालयातून १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देऊन यश मिळवणाऱ्या उषा खुडे यांचा विद्यार्थ्यांसमवेत सत्कार करण्यात आला. खुडे या अंगणवाडी सेविका आहेत. लहान मुलांना शिक्षण देऊन घर सांभाळून त्यांनी बारावीची परीक्षा दिली. मुलगी इंजिनिअर झाली. मुलगा बीएस्सी करत आहे. एका मुलीने बी.कॉम. अभ्यासक्रम पूर्ण केला. आपली मुले घरात इंग्रजी भाषेत संभाषण करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून खुडे यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निश्चय केला आहे.
महाविद्यालयातील सत्काराला उत्तर देताना खुडे म्हणाल्या, ‘बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेवून बी.ए.पदवी मिळविणार आहे.
शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळविण्यासाठी नाही तर मुलांवर व नातवंडांवर संस्कार करण्यासाठी सुद्धा होतो.
त्यामुळे वय झाल्याने शिक्षण सोडलेल्या महिलांना पुन्हा शिक्षण घ्यायला सुरूवात केली पाहिजे.