औरंगाबाद विभागातही मुलीच अव्वल
By Admin | Published: May 30, 2017 06:02 PM2017-05-30T18:02:19+5:302017-05-30T18:02:19+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर केला.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 30 - माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर केला. यंदाही निकालात मुलांना मागे टाकत मुलींनीच बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ८९.८३ टक्के असून यामध्ये मुलींचा निकाल ९२.७५ टक्के, तर मुलांचा निकाल ८८.११ टक्के लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६४ टक्क्यांनी अधिक आहे.
विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिशीर घनमोडे यांनी दुपारी हा निकाल जाहीर केला. यावेळी विभागीय सचिव वंदना वाहुळ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित होते. घनमोडे यांनी सांगितले की, औरंगाबाद विभागात नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८९.८३ इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी निकालात मुलींची आघाडी कायम आहे. विभागीय शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांना येत्या ९ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांनी सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे काही दिवस पेपर तपासणीचे संथगतीने झाले. त्यानंतर मात्र, तपासणीचे काम सुरळीत झाले. त्यामुळे निकालाला थोडा वेळ लागल्याचे मंडळाचे अध्यक्ष घनमोडे यांनी सांगितले. यावर्षी बारावीची पुरवणी परीक्षा ११ जुलैपासून घेतली जाणार आहे.
फेब्रुवारी- मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागात १ लाख ६२ हजार ६६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये नियमित विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५७ हजार ४४६, तर पुनर्परीक्षार्थी ४ हजार ६२० होते. यापैकी १ लाख ४३ हजार ४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ४१ हजार ४३२ नियमित परीक्षार्थी, तर २ हजार १९ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे. विज्ञान शाखेत ६८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७४ टक्के आहे. वाणिज्य शाखेत १२ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९१.५७ टक्के एवढे आहे. कला शाखेत ५६ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.६१ एवढे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. व्होकेशनलचे ४ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागात परभणीची आघाडी
औरंगाबाद विभागात बारावीच्या निकालामध्ये परभणी जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८९.७६ टक्के असून ५३ हजार ५३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बीड जिल्ह्यात ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९०.४९ इतकी आहे. परभणी जिल्ह्यात १९ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल ९०.५९ टक्के लागला आहे. जालना जिल्ह्यात २३ हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८८.४९ टक्के एवढे निकालाचे प्रमाण आहे. हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८९.८३ टक्के एवढा असून या जिल्ह्यात ११ हजार १९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.