मुलींचा जन्मदर कमी होतोय , महिला आयोगाच्या अध्यक्षांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:20 AM2017-08-28T05:20:50+5:302017-08-28T05:21:25+5:30
राज्य महिला आयोग हा सर्व महिलांसाठी आहे. त्यामुळे आमच्याकडे अनेक प्रकरणे आहेत, त्यापैकी बरीच सोडविण्यात आली आहेत.
मुंबई : राज्य महिला आयोग हा सर्व महिलांसाठी आहे. त्यामुळे आमच्याकडे अनेक प्रकरणे आहेत, त्यापैकी बरीच सोडविण्यात आली आहेत. समाजातील तळागाळात कार्य सुरू असताना, दुस-या बाजूला मुलींचा जन्मदर वाढत नाही, ही खेदजनक बाब आहे, अशी खंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केली.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय जाहीर केला. सोनोग्राफी मशिनला अॅक्टिव्ह ट्रॅकर बसविण्यात येणार नाही, असे डॉ. सावंत यांनी ठामपणे सांगितले. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने डॉक्टरांची मते जाणून घेण्यासाठी, नुकतीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सोनोग्राफी मशिनमध्ये अॅक्टिव्ह ट्रॅकर बसवू नका, ही आग्रही मागणी डॉक्टरांनी लावून धरली. या नकारासाठी ठोस युक्तिवादही या डॉक्टरांनी केला. काही डॉक्टर्स मात्र, अॅक्टिव्ह ट्रॅकरचे फायदे पटवून देताना दिसले. थोडक्यात, या विषयावर डॉक्टरांमध्ये दोन गट पडलेले दिसून आले.
गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक (पीसीपीएनडीटी) आणि एमटीपी या दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी हा कळीचा विषय ठरतो आहे. या कायद्यांचे पालन कसोशीने होणे गरजेचे असल्याबाबत मात्र, डॉक्टरांमध्ये एकमत दिसले. अॅक्टिव्ह ट्रॅकरच्या विषयावर विस्ताराने चर्चा झाली खरी, पण अॅक्टिव्ह ट्रॅकरची उपयुक्तता आणि हाताळणी याबाबत मात्र, डॉक्टरांमध्ये मतभिन्नता होती.