‘दामिनीं’मुळे वाढलेय मुलींचे धाडस
By admin | Published: July 22, 2016 12:44 AM2016-07-22T00:44:18+5:302016-07-22T00:44:18+5:30
शिक्षक, कुटुंबातील जवळचे नातेवाइकांकडूनही शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
प्राची मानकर/प्रीती जाधव,
पुणे- रस्त्यावरील टोळकी, बसमधले अनोळखीच नाही तर शिक्षक, कुटुंबातील जवळचे नातेवाइकांकडूनही शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या महिला बीट मार्शल उपक्रमामुळे मुली आता बोलत्या होऊ लागल्या आहेत. कायद्याचा आधार मिळाल्याने संकोच सोडून तक्रारी करत आहेत. बीट मार्शलच्या रूपात आलेल्या या तेजस्विनींकडून प्रत्येकच वेळी तक्रार दाखल करण्यापेक्षा थोडासा ‘हात’ दाखविण्याची पद्धत अवलंबली जात असल्याने अनेक ठिकाणी त्रास कमी होतोय. मात्र, तक्रार करणाऱ्या मुलींना कुटुंबातून आधार मिळत नाही, हे वास्तवदेखील पुढे आले आहे.
मुलींवरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी राज्यात दामिनी स्क्वॉड सुरू करण्यात आले आहे. पुण्यामध्ये याअंतर्गत २९ महिला बीट मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक भागासाठी दोन बीट मार्शल आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात फिरण्याबरोबरच त्यांच्याकडून विद्यार्थिनींशी संवादही साधला जातो. या महिला मार्शल सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत कॉलेजचा आवार, हॉस्टेल, कॅन्टीन, शहरातील टेकड्या, बागेत फिरतात. मुला-मुलींच्या तक्रारी असतील त्या जाणून घेऊन गुन्हा दाखल करतात. मुलींच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात. त्याप्रमाणे तातडीने कारवाईही होत आहे. विशेषत: शाळांमध्ये बीट मार्शलकडून मुलींशी विश्वासाने संवाद साधला जातो.
>जर कोणी छेड काढीत असेल, पाठलाग करीत असेल तर निर्भय होऊन पुढे या. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. महिला आणि मुलींनी न घाबरता तक्रारी द्याव्यात. रोडरोमियोंवर कडक कारवाई केली जाईल. स्थानिक पोलीस ठाण्यांच्या महिला बीट मार्शल आणि दामिनी स्क्वॉडच्या महिला पोलीस शहरात सर्वत्र गस्त घालतात. महिला बीट मार्शलमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रतिसाद अॅप महिला आणि मुलींनी डाऊनलोड करून घ्यावे.
- रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त पुणे
>1091
हेल्पलाइन नंबर
शाळा आणि महाविद्यालयातील तरुणींची छेडछाड झाल्यास १०९१ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्यार्थिनींना वैयक्तिक क्रमांकही बीट मार्शल देतात. अनेक मुली त्याच्यावर न संकोचता फोन करतात.
पाठलाग करून दिला टिंगलखोरांना चोप
संगीता (नाव बदलले आहे) या एफवायला शिकणाऱ्या तरुणीचा कॉलेजला जाताना तीन मुले पाठलाग करायची. कॉमेंट पास करायची. एकदा बीट मार्शल राऊंडला गेल्या असता त्यांना ही मुले छेडछाड करताना आढळली. त्यांनी मुलीशी संवाद साधला. बऱ्याच दिवसांपासून आपल्याला ही मुले त्रास देत आहेत, असे तिने सांगितले. बीट मार्शलने प्राचार्यांच्या कानावर हा प्रकार घातला. या मुलांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे महाविद्यालयातील शिक्षकांनीही या विद्यार्थिनीला आधार दिला. तिच्याबरोबर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी ते गेले.
शिक्षक, जवळच्या कुटुंबीयांकडून
होणाऱ्या त्रासाचे करायचे काय?
बाहेरच्या टिंगलखोरांविरुद्ध तक्रार तर मुली देऊ लागल्या आहेत; पण शाळेतच शिक्षकांकडून होणारा त्रास आणि जवळच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाचे काय करायचे हा प्रश्न आहे. बीट मार्शलही अनेकदा याबाबत निरुत्तर होतात. शाळेमध्ये शिक्षकांकडूनही त्रास होत असल्याच्या काही घटना बीट मार्शलकडून साधण्यात आलेल्या संवादामुळे पुढे आले आहे.
शाळेमध्ये माझे शिक्षक कुठेही स्पर्श करतात. घरी सांगितल्यावर माझी
शाळाच बंद होईल आणि शाळेत मुख्याध्यापिकांना सांगितले तर माझीच बदनामी होईल, असे एका मुलीने सांगितले. बीट मार्शलने मुख्याध्यापिकेला सांगून या शिक्षकांना चांगलाच धडा शिकविला.
शाळेतील मुलींशी संवाद साधताना वडील, मामेभाऊ यांच्याकडूनच आपल्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याचे बीट मार्शलला समजले. त्यांनी या प्रकाराची कल्पना मुलीच्या आईला दिली. मात्र, आईने गुन्हा नोंदविण्यास नकार दिला.
>विद्यार्थिनींनीही बोलायला शिकले पाहिजे
मुलीची छेडछाड जर एखाद्या मुलाने काढली तर शांत न बसता त्या मुलीनेही बोलले पाहिजे. त्यामुळे मुले कधी तुमची छेड काढणार नाही. आम्ही बीट मार्शल अशा मुलींना समुपदेशन करतो आणि आमचा वैयक्तिक नंबर देतो. त्यामुळे त्या आमच्याशी मोकळेपणाने संवाद साधतात.