मुलींच्या पहिल्या शाळेचे रुपडे पालटले !

By admin | Published: May 3, 2015 01:02 AM2015-05-03T01:02:39+5:302015-05-03T01:02:39+5:30

माहेरघर असलेल्या पुण्यातील मुलींच्या पहिल्या शाळेची अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या ज्ञानयज्ञ स्थळाची झालेली दुरवस्था पाहून

Girls' first school transforms! | मुलींच्या पहिल्या शाळेचे रुपडे पालटले !

मुलींच्या पहिल्या शाळेचे रुपडे पालटले !

Next

हरिओम बघेल, आर्णी (यवतमाळ)
माहेरघर असलेल्या पुण्यातील मुलींच्या पहिल्या शाळेची अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या ज्ञानयज्ञ स्थळाची झालेली दुरवस्था पाहून ग्रामीण भागातील एका शिक्षकाचे मन सुन्न झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने मित्रांना आवाहन केले. बघता बघता अनेक मित्र गोळा झाले आणि शाळेची साफसफाई करून त्यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध केले. हा शिक्षक आहे यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील करंजखेड (नवीन) येथील अमित ईश्वर वानखडे.
शिक्षक प्रशिक्षणासंदर्भात पुणे येथे एप्रिलमध्ये बैठक होती़ अमित वानखडे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेले होते़ पुणे येथे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला उत्सुकता म्हणून त्यांनी भेट दिली. तेथील प्रकार पाहून मात्र ते अस्वस्थ झाले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देता यावे म्हणून भिडेवाड्यात १९४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. मात्र सध्या या शाळेच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
या वाड्याच्या खाली दुकान आणि वर दोन खोल्या आहेत. येथेच ही शाळा होती. शाळेची दारे आणि खिडक्या सडून गेल्या आहेत. खोल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते. कौलारू छत असून पाणी गळू नये म्हणून प्लास्टिक लावले आहे. हा प्रकार पाहून अमितने मित्रांना माहिती दिली, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या शाळेची साफसफाई करण्याचे आवाहन केले. पुणे, सोलापूर आणि यवतमाळ, आर्णीवरून नोकरीनिमित्त असलेली मंडळी एकत्र आली. या पवित्र जागेची स्वच्छता केली.
राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. शासनच नव्हे, तर पुण्यातील कोणाचेही याकडे लक्ष नव्हते. मात्र अमित वानखडेसोबत अविनाश चौधरी, विजय वढेराव, हर्षवर्धन मकदूम, प्रदीप तांबे, धनंजय सातपुते, संतोष आगलावे, राहुल चैत्रव, अमोल नवले, योगेश जाधव यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध केले.

Web Title: Girls' first school transforms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.