बारावीत यंदाही मुलींची बाजी
By admin | Published: May 26, 2016 04:22 AM2016-05-26T04:22:48+5:302016-05-26T04:22:48+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलींचा निकाल ९०.५० तर मुलांचा ८३.४६ टक्के एवढा लागला आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलींचा निकाल ९०.५० तर मुलांचा ८३.४६ टक्के एवढा लागला आहे. बुधवारी आॅनलाइन निकाल जाहीर झाला. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८६.६० इतकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ४.६६ टक्क्यांची घट झाली. कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.
राज्य मंडळाने फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेतलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी केली. विद्यार्थ्यांना ३ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित महाविद्यालयात मूळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल विक्रमी ९१.२६ टक्के लागला होता. यंदा मंडळाने प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती केली होती. परिणामी विद्यार्थ्यांना सढळ हाताने दिल्या जाणाऱ्या गुणांवर नियंत्रण आले. राज्यातील ४५७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के तर शून्य टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या ३६ आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातील ७ लाख ३१ हजार ३९२ मुलांपैकी ६ लाख १० हजार ४०० मुले उत्तीर्ण झाले तर ५ लाख ८८ हजार ३६२ मुलींपैकी ५ लाख ३२ हजार ४८२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
४५७ महाविद्यालये शंभर नंबरी
४५७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के तर ३६ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला. शंभर टक्के निकालात पुणे विभागातील सर्वाधिक १०१, मुंबई विभागातील ६६, नागपूर विभागातील ५७, कोल्हापूरचे ५६, अमरावती व कोकणचे प्रत्येकी ४३, औरंगाबादचे ३४, लातूरचे १४ व नाशिक विभागातील १३ महाविद्यालये आहेत.
शून्य टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांमध्ये औरंगाबाद विभाग आघाडीवर आहे. तेथील १४ महाविद्यालयांचा यादीत समावेश आहे. लातूर विभाग ७, नागपूर विभाग ६, पुणे विभाग ५, मुंबई व अमरावती विभागाच्या प्रत्येकी २ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला.
प्रवेशासाठी पुनर्मूल्यांकनात प्राधान्य
आॅनलाइन निकालानंंतर विद्यार्थ्यांना ४ जूनपर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. तर १४ जूनपर्यंत छायांकित प्रतीसाठी अर्ज करावा लागेल. छायांकित प्रति मिळाल्यानंतर ५ दिवसांपर्यंत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तातडीने पुनर्मूल्यांकन करून घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी जेईई, नीट किंवा संंबंधित प्रवेश परीक्षांचे प्रवेशपत्र जोडावे लागेल.