घरांना लावल्या मुलींच्या नावांच्या पाट्या
By admin | Published: January 3, 2017 09:00 AM2017-01-03T09:00:41+5:302017-01-03T09:00:41+5:30
पारतंत्र्य अनुभवणारी स्त्री खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पाईक व्हावी या उद्देशाने येवला येथील शिक्षक कॉलनीत घरांना मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सर्वत्र कौतुक : महालखेडा शाळेतील शिक्षकांचा उपक्रम
दत्ता महाले, ऑनलाइन लोकमत
येवला (नाशिक) , दि. ३ - स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार ,मुलामुलींमध्ये केला जाणारा भेद, हुंडाबळी हे बघितले की मन अगदी सुन्न होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यामुळे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. तरीही तिच्या नशिबी असणारी हेळसांड थांबत नाही. ही खेदाची बाब आहे. पारतंत्र्य अनुभवणारी स्त्री खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पाईक व्हावी या उद्देशाने अंगणगाव येथील शिक्षक कॉलनीत घरांना मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आल्याने उपक्र मशील शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महालखेडा येथील प्राथामिक शाळेतील या शिक्षकांनी शाळेतील तसेच गावातील मुलींच्या नावाच्या पाट्या त्यांच्या घराच्या दरवाजाला लावून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हा अनमोल संदेश दिला. हाच आदर्श समोर ठेवून येथील शिक्षक ज्ञानेश्वर पायमोडे, ज्ञानेश्वर बारगळ, सुरेश ठोंबरे यांनी कॉलनीतील सर्व पन्नास मुलींच्या घराच्या दरवाजाला त्यांच्या नावाच्या पाट्या लावून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हे अभियान राबविले. या उपक्रमाने कॉलनीतील सर्व पालक आपल्या लाडलीचे होत असणारे कौतुक पाहून आनंदीत झाले. माता पालकांचे डोळे भरून आलेले पाहायला मिळाले .
नुकताच मुलीला जन्म दिलेली माता योगिता कुणाल जगताप यांचा या प्रसंगी सुरेश ठोंबरे, ज्ञानेश्वर पायमोडे, ज्ञानेश्वर बारगळ या शिक्षकांनी सत्कार करून स्त्री जन्माचे स्वागत केले. याप्रसंगी राजेंद्र जगताप, दिलीप धिवर, गोरक्षनाथ थोरात, सुदाम कटारे, विजयसिंह चव्हाण, भागवत जगताप, संतोष कुमावत, दत्ता दवंगे, अजय जाधव यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानदानाचे काम करता करता शिक्षकांनी सामाजिक जाणिवेतून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हा संदेश लेकीच्या नावाची पाटी दरवाजाला लाऊन समाजापर्यंत पोहोचवला हे कार्य गौरवास्पद आहे.
-विठ्ठल आठशेरे, सरपंच अंगणगाव ता. येवला