पाणी नाही म्हणून लग्नासाठी मिळेनात मुली
By Admin | Published: March 1, 2017 12:26 AM2017-03-01T00:26:45+5:302017-03-01T00:26:45+5:30
नात्यांची गुंफण होताना देखील पाणी आहे का प्रश्न पहिला विचारला जाऊ लागला आहे
अयाज तांबोळी,
डेहणे- पाणी टंचाईने जीवाची काहिली तर होऊ लागलीच आहे पण आता नात्यांची गुंफण होताना देखील पाणी आहे का प्रश्न पहिला विचारला जाऊ लागला आहे. मिळेल त्या घागरीत दिवस काढावा लागत असल्याने आता तरुण पोरांना लग्नासाठी मुली देखील मिळत नसल्याचे रखरखीत वास्तव समोर येत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भाग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याने व्यापला आहे. पावसाळ्यात प्रचंड पडणारा पाऊस व उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही, अशी स्थिती असलेला हा विभाग; तसं नाही म्हणायला चासकमान धरण याच भागात, पण असून नसल्यासारखे. या धरणामुळे या भागात हरितक्रांती घडून येईल, अशा अपेक्षेने ग्रामीण शेतकऱ्यांनी जगण्याचा आधार असलेल्या पिकावरच्या जमिनी दिल्या परंतु, आज त्यांना शेतीला सोडाच, पण पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही, अशी शोकांतिका आहे. आव्हाट गाव धरणाच्या कडेला आहे, या गावच्या वाड्यांचा परिसर पूर्ण डोंगराळ आहे. बुरुडवाडी, भागीतवाडी, भगतवाडी, तरपाडेवाडी व अशा अनेक वस्त्या स्वातंत्र्याच्या सत्तरीतही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. यांचा मूक टाहो ऐकणारी मायबाप सरकार व प्रशासकीय यंत्रणा मात्र गेंड्याची कातडी पांघरून सुस्त झाली आहे. आव्हाटची तरपाडेवाडी २०-२२ घरांची, ७० ते ८० माणसे. ही वस्ती दिवाळीपासूनच सकाळी भल्या पहाटे उठून पाण्यासाठी पायपीट करते. ५ ते ६ किमीवरून पाणी आणण्यासाठी कधी डोंगर चढायचा तर कधी दरी उतरून खाली जाऊन पाणी आणायचे. चासकमान धरणाचं पाणी दिसत असूनही या वस्तीला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
>दिवाळीपासून पाणी-पाणी करतेय माझी वस्ती
सुना लेकरं काम सोडून रानोमाळ झरं शोधत्यात, मिळल तेवढ्या घागरीत दिवस काढायचा. पोटभरून पाणी प्यायची सवय राहिली नाही, लेकरं रातच्याला उठल्यावर त्यांच्यासाठी पाणी जपून ठेवावं लागतं. तरुण पोरांना या पाणीटंचाईमुळे पोरी मिळंणात, आमची हयात गेली आता तरी गावानं आमचं गाऱ्हाणं ऐकावं.- भागुजी मारुती तरपाडे,
ज्येष्ठ नागरिक तरपाडेवस्ती