गरिबांच्या मुलींची ब्रिटिशकालीन जि.प.ची कन्या शाळा तोडून नामशेष करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 08:59 PM2017-10-17T20:59:09+5:302017-10-17T20:59:40+5:30
शहरातील गरीब मुलींसाठी येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीशकालीन आहे. मात्र तिला तोडून येथील विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतरित करणार आहे.
ठाणे : शहरातील गरीब मुलींसाठी येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीशकालीन आहे. मात्र तिला तोडून येथील विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतरित करणार आहे. मुख्य कार्यकारी विवेक भीमनवार यांनी विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी कन्या शाळे विषयी विचारले असता ही शाळाच सहा महिन्यांच्या कालावधीत तोडणार असल्याचे यावेळी उघड झाले.
येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेने पत्रकार परिषद घेऊन कामकाजासह विकासाचा आढावा उघड करण्यात आला. ग्रामीण भागातील सुमारे एक हजार ३६३ शाळा शंभर टक्के डिजिटल केल्याचा दावा करताना ९५० शाळा देखील प्रगत केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यास अनुसरून शहरात असलेली ब्रिटिशकालीन जिल्हा परिषदेची कन्या शाळा डिजिटल का झाली नाही, या विषयी विचारले असता ही शाळा तोंडणार असल्याचे भीमनवार यांच्यासह शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. शाळा तोडल्यानंतर संबंधित भूखंडाचा वापर कशासाठी करणार, यावर मात्र समाधानकारक उत्तर देता आले नाही. जिल्हा परिषदेत येणा-या लोकप्रतिनिधींची बॉडी या भूखंडाचा काय तो विचार करणार असल्याचे शेंडकर यांनी सांगितले.
चांगल्या कामांमुळे राज्यपालांनी पुरस्कृत केलेल्या शेंडकर यांना जिल्हा परिषदेची ही कन्या शाळा ठाणे महापालिकेत वर्ग करण्यात आल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘आम्ही तर काही प्रस्ताव दिलेला नाही ’ असे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळले. शाळेच्या या भूखंडाचा वापर कशासाठी करणार... मुलांना अन्य शाळेत स्थलांतरित करणार... यावरून शाळेचे विद्यार्थी महापालिकेसह अन्य शाळांमध्ये समाविष्ट होणा-या शिक्षणाधिका-यांना याची भनक नसणे योग्य नसल्याचे निदर्शनात आले. महिला व मुलींच्या सबलीकरणासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. पण गरीब, दीन दलितांच्या मुली शिक्षण घेत असलेली कन्या शाळा तोडून हा भूखंड जिल्हा परिषद मोकळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून उघड झाले. ‘लेक शिकवा’ असे शासनाचे उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद ग्रामीण भागाप्रमाणे कन्या शाळेला डिजिटल न करता तिला आगामी सहा महिन्यांत तोडण्याचे नियोजन करीत आहे. यामुळे हक्काच्या शाळेपासून वंचित होणा-या ठाणे शहरातील सावित्रीच्या लेकींना शहरातील महागड्या शाळेत शिकणे शक्य नसल्याचे उघड होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा करणा-या जिल्हा परिषदेच्या सुमारे दहा शाळा मागील वर्षात बंद पडल्याचे या पत्रकार परिषदेत उघड झाले. विद्यार्थी संख्येअभावी दुस-याजवळच्या तीन किलोमीटरच्या शाळेत या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले. शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी हा कार्यक्रम राबवताना विद्यार्थ्याच्या वाहन व्यवस्थेची देखील काळजी घेतली जात असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ९५ हजार शौचालये बांधून जिल्हा शंभर टक्के हगणदारीमुक्त होत आहे, नादुरुस्ती शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली, ६५ ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे आराखडे तयार झाले, गावातील शाळांच्या वीज पुरवठ्याचे बिल भरण्यासह साफसफाई व शौचालयांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आली.
घरकूल बांधणीत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून बहुतांशी घरकूल बांधून पूर्ण झाले. विविध करणांनी रखडलेल्या सुमारे १८८ पाणी पुरवठा योजनांचे कामे पूर्ण करण्यात आले. सॅम, मॅमचे बालके कुपोषणातून मुक्त करण्याची प्रगती आदी विविध विषयांची माहिती भीमनवार यांनी देऊन जिल्हा परिषदेच्या प्रगतीचा आढावा पत्रकारांसमोर उघड केला. यावेळी भरारी या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.