पुणतांब्यातील आंदोलक मुलींची रुग्णालयात रवानगी; पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 07:31 AM2019-02-09T07:31:24+5:302019-02-09T07:48:54+5:30
शेतकरी कन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस; पोलिसांच्या कारवाईमुळे गावात तणाव
अहमदनगर: पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या मुलींना रात्री उशिरा पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावरुन पुणतांब्यात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी बळजबरीनं ही कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचं विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा या मुलींनी दिला आहे. मात्र मध्यरात्री मुलींना रुग्णालयात दाखल करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्यांसाठी पुणतांब्यातील तीन मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केलं. आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. मात्र अद्याप तरी याबद्दल कोणताही तोडगा निघालेला नाही. काल पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली.
अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शुभांगी जाधव या मुलीला अस्वस्थ वाटू लागल्यानं तिला रात्री अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर पोलिसांनी तिच्या सोबत आंदोलन करत असलेल्या मुलींचीही रुग्णालयात रवानगी केली. मुलींची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलनकर्त्या मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावेळी काही ग्रामस्थांनादेखील ताब्यात घेण्यात आलं. यामुळे पुणतांब्यात मोठा तणाव निर्माण झाला. त्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.