मुलींनो, हुंडा मागणाऱ्यांना नकार द्या
By admin | Published: April 21, 2017 06:10 AM2017-04-21T06:10:27+5:302017-04-21T06:10:27+5:30
कोणतेही प्रश्न हे केवळ कायदा किंवा आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने सुटतील ही समजूत चुकीची आहे. हुंड्याच्या प्रथेविरुद्ध मुलींनी..
नम्रता फडणीस , पुणे
कोणतेही प्रश्न हे केवळ कायदा किंवा आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने सुटतील ही समजूत चुकीची आहे. हुंड्याच्या प्रथेविरुद्ध मुलींनी स्वत:च आवाज उठवला पाहिजे. लग्नामध्ये हुंडा मागणाऱ्या मुलाला मुलींनीच नाकारले पाहिजे आणि कुटुंबासह समाजानेदेखील त्यांना साथ दिली पाहिजे तरच हुंडाबळीच्या घटनांना आळा बसेल, अशा शब्दांत अमृता देवेंद्र फडणवीस यांनी मुलींनाच स्वत:च्या हक्काची जाणीव करून देत हुंडाप्रथेवर टीकास्त्र सोडले.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्ताने त्या आल्या असता ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीने लग्नाचा खर्च करणे शक्य नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला आणि अवघा महाराष्ट्र या घटनेने सुन्न झाला. आजही काही समाजामध्ये लग्नात हुंडा मागितला जातो, तो देण्याची ऐपत नसल्याने तरुणींना मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. कितीतरी मुली या छळाला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडतात. या पार्श्वभूमीवर बोलताना ‘मुलींनीच हुंड्याच्या प्रथेविरुद्ध एल्गार पुकारला पाहिजे’असे परखड विचार अमृता फडणवीस यांनी मांडले.
त्या म्हणाल्या, दुष्काळाने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जगण्यावरच घाला घातला आहे, तो नैराश्यामध्ये आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कुटुंबाला लग्नाचा खर्च करणे
शक्य नाही. याचा विचार हुंडा मागणाऱ्या मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी केला पाहिजे.
हुंडा मागणाऱ्यांना समाजासमोर आणले पाहिजे. मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे केल्यास हुंडा मागणाऱ्या
मुलाला नाकारण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल. त्यांच्या मतांचा कुटुंबीयांनीही सन्मान करायला हवा. तरच समाजाच्या मानसिकतेत बदल होईल.
केवळ कायद्याने महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि आत्महत्या देखील त्यावरचा उपाय नाही, असेही त्यांनी सुनावले. ज्या गावातील कुटुंबाकडे लग्नासाठी पैसे नाहीत, त्यांनी सहकार्यासाठी ग्रामपंचायतीचा दरवाजा ठोठावला पाहिजे, त्यांच्याकडून नक्कीच आर्थिक मदत मिळू शकते. तसेच समाजानेही अशा कुटुंबाच्या हाकेला साद
घातली पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)