मुलींच्या विक्रीचे रॅकेट उघडकीस
By Admin | Published: December 12, 2015 02:37 AM2015-12-12T02:37:16+5:302015-12-12T02:37:16+5:30
येथील मिसारवाडीतील विवाहितेच्या अमानुष छळ प्रकरणाला कलाटणी मिळाली असून, पोलीस तपासात मुलींची विक्री करणारे मोठे रॅकेटच उघडकीस आले आहे.
औरंगाबाद : येथील मिसारवाडीतील विवाहितेच्या अमानुष छळ प्रकरणाला कलाटणी मिळाली असून, पोलीस तपासात मुलींची विक्री करणारे मोठे रॅकेटच उघडकीस आले आहे. बुधवारी पोलिसांनी चार दलालांना अटक केल्यानंतर शुक्रवारी आणखी दोन दलाल महिलांना ताब्यात घेतले.
संबंधित टोळीने गरीब कुटुंबांची फसवणूक करून अनेक मुलींना विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. छाया जाधव आणि आशा सोनवणे (दोघी, रा. रामनगर, मुकुंदवाडी) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. सिडको पोलिसांनी याआधी मिसारवाडीतील पीडित विवाहितेची मानलेली मावशी सुवर्णा ऊर्फ शकुंतला वंजारे, सुखदेव सूर्यनारायण, सुरेखा बावणे, विठ्ठल पवार यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही टोळी गरीब कुटुंबांतील मुलींचा शोध घेऊन त्यांचे लग्न लावून देते. लग्न लावण्यासाठी वरपक्षाकडून पैसे वसूल केले जातात. विशेष म्हणजे मुलींचे आईवडील किंवा इतर नातेवाइकांना या आर्थिक व्यवहारात पूर्णपणे अंधारात ठेवले जात असे. या टोळीने मिसारवाडीतील अग्रवाल कुटुंबीयांना अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथील ही मुलगी विकली होती. या व्यवहारात ९५ हजार रुपये त्यांनी वसूल केले. (प्रतिनिधी)
मिसारवाडीतील पीडितेला ९५ हजारांत विकल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी दलालांची टोळी जेरबंद केली. या टोळीने राज्यभरात अनेक मुलींना विकल्याचे उघड झाले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. विक्री केलेल्या मुलींचा शोध घेण्यात येईल. त्यांनी तक्रार दिल्यास या टोळीवर आणखी गुन्हे नोंदविण्यात येतील. सामाजिक दृष्टिकोणातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या शरद या मोठ्या मुलाच्या पत्नीलाही असाच त्रास दिल्याची माहिती मिळाली आहे. पीडित महिलेने तक्रार दिल्यास कारवाई करण्यात येईल, असेही अमितेशकुमार यांनी सांगितले.