‘त्या’ तरुणीचा जबाब नोंदविला
By Admin | Published: March 1, 2017 02:08 AM2017-03-01T02:08:55+5:302017-03-01T02:08:55+5:30
शारीरिक व मानसिक शोषण करण्यात आलेल्या पीडित तरुणीचा अखेर मंगळवारी मुंबई पोलिसांनी रीतसर जबाब नोंदवला आहे.
जमीर काझी,
मुंबई- दोन पोलीस कॉन्स्टेबलकडून शारीरिक व मानसिक शोषण करण्यात आलेल्या पीडित तरुणीचा अखेर मंगळवारी मुंबई पोलिसांनी रीतसर जबाब नोंदवला आहे. गुन्हे शाखेच्या अखत्यारीतील महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. आता अधिकारी याबाबत संबंधित कॉन्स्टेबलविरुद्ध कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे व संतोष कदम हे सोमवारपासून गैरहजर असून त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई केली जाणार का? की केवळ चौकशीचा फार्स लावला जाईल, याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पीडित तरुणी धनश्रीला (नाव बदलले आहे) विवाहाचे आमिष दाखवून कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याने शारीरिक संबंध ठेवले. गर्भवती राहिल्यानंतर मारहाण करून तिचा गर्भपात केला. त्यानंतर याबाबत कोठेही वाच्यता न करण्याबाबत तो आणि त्याचा पोलीस सहकारी संतोष कदम हे धनश्रीला धमकावत होते. नियुक्तीला असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून भोईवाडा पोलिसांकडून तिच्यावर खोटी कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सोमवारी पीडितेवरील अत्याचाराबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आला. तर सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग यांच्याकडे कार्यरत असलेल्या तिऊरवडेची तेथून उचलबांगडी करून मूळ सशस्त्र विभागात (एल) पाठविण्यात आले. तो व कोकण परिमंडळाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडे कार्यरत असलेला कॉन्स्टेबल संतोष कदम सोमवारपासून कामाच्या ठिकाणी आले नसल्याचे कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक प्रभा राऊळ यांनी मंगळवारी पीडित तरुणीचा सविस्तर जबाब नोंदविला. आता याबाबत त्या दोन कॉन्स्टेबलना पाचारण करून त्यांचा जबाब घेतला जाणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून याबाबत गुुन्हा दाखल करणे अथवा तक्रार अर्ज निकालात काढण्याची कार्यवाही केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. वृत्ताची राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाने दखल घेतली असून पीडित तरुणीला तक्रार देण्यासाठी बोलाविले आहे.
संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
पीडित तरुणी ही सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग व कोकण विभागाचे आयजी प्रशांत बुरडे यांच्याकडे कैफियत मांडण्यासाठी गेली होती. त्या वेळी त्यांच्याकडून तसेच भोईवाडा पोलिसांनी केलेल्या व्यवहाराबाबत तरुणीने मुंबई ट्रॅफिक विभागातील भ्रष्टाचाराबाबत जनहित याचिका दाखल केलेल्या हवालदार सुनील टोके यांना मोबाइलवरून सांगितले होते. या संभाषणाची सुमारे ४२ मिनिटांची क्लिप सर्व पोलीस वर्तुळ व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींकडे व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.