शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:08 AM2017-07-19T01:08:58+5:302017-07-19T01:08:58+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना : दहावीत मिळाले होते ७२ टक्के गुण

Girl's suicide due to lack of education! | शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीची आत्महत्या!

शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीची आत्महत्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : वडील आॅटो चालवितात; तर आई मिळेल ते मोलमजुरीचे काम करते. या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर चार मुली आणि एका मुलाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार तरी कसा ? दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण पूर्ण झाले; परंतु पुढच्या शिक्षणासाठी पैसे कसे मिळणार? लग्नासाठीदेखील पैसे लागणारच, आदी प्रश्नांनी घेरल्या गेलेल्या पोहा येथील पल्लवी गोकुल तायडे (वय १६ वर्षे) या मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना सोमवार, १७ जुलै रोजी उघडकीस आली.
मृतक पल्लवी तायडे ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिच्या कुटुंबात आई-वडिल, तीन बहिणी आणि एक भाऊ असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च, लहान-सहान आजार यासह भविष्यात लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करीत असताना आई आणि वडील दोघांचीही दमछाक होत होती. अशा विदारक परिस्थितीत लहानाची मोठी झालेल्या पल्लवीने वसंत विद्यालय, पोहा येथे शिकत असताना कठीण परिश्रमातून दहावीच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळविले होते. मात्र, पुढचे शिक्षण घ्यायचे म्हटले तर गाव सोडून शहरात जावे लागणार होते. दरम्यान, कमीत कमी खर्चात कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, याची चाचपणी करीत असताना पल्लवीने तीन ते चार महाविद्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र, ११ वी नंतरचे शिक्षण कमी पैशात कदापि शक्य नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर तिने हलाखीच्या आर्थिक परिस्थितीसमोर गुडघे टेकत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली,असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पोहा गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

‘त्या’ मातेचा आक्रोश असह्य करणारा!
चार मुली आणि एका मुलगा यामध्ये सर्वात मोठी असलेल्या पल्लवीने १७ जुलै रोजी घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात घेताच तिच्या आईने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावून तिचा गळफास सोडवून घेतला. तिला उपचाराकरिता कारंजाच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १७ जुलैच्या मध्यरात्री उपचारादरम्यान पल्लवीची प्राणज्योत मालवली. मुलीच्या अशाप्रकारच्या मृत्यूमुळे तिच्या आईने केलेला आक्रोश असह्य करणारा होता.

Web Title: Girl's suicide due to lack of education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.