लग्नास नकार दिल्याने मुलीवर शस्त्राने वार
By admin | Published: August 1, 2016 10:39 PM2016-08-01T22:39:51+5:302016-08-01T22:39:51+5:30
तालुक्यातील चिरणे येथील कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका युवतीने लग्नास नकार दिल्याने मयुर गिरासे (रा. वरसुस) याने संबंधित विद्यार्थिनी घरी जात असतांना रस्त्यात अडवून
ऑनलाइन लोकमत
शिंदखेडा, दि. १ - तालुक्यातील चिरणे येथील कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका युवतीने लग्नास नकार दिल्याने मयुर गिरासे (रा. वरसुस) याने संबंधित विद्यार्थिनी घरी जात असतांना रस्त्यात अडवून गळ्यावर व छातीवर धारदार सुऱ्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना शिंदखेडा चिरणे रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
संबंधित युवती ही मंगळवारी सायंकाळी तिच्या मैत्रीणीसोबत रिक्षाने जात होती. त्याचवेळी आरोपीने तिच्यावर वार केला. ही घटना घडली. त्यावेळी चिरणे-कलाणे येथील विनायक बापू पाटील, गोविंद तावडे, दिनेश तावडे व दिनेश नगराळे हे मोटरसायकलने याच रस्त्यावरून घरी जात होते. तेव्हा मयुर गिरासे याने त्याच्या हातातील सुरा त्याचठिकाणी टाकून पळून काढला.
ग्रामीण रुग्णालयात दाखल
जखमी अवस्थेत संबंधित विद्यार्थिनीला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉ. विनय पवार यांनी संबंधित युवतीवर तातडीने उपचार केले. जखमी झाल्यामुळे या युवतीच्या गळ्यावर पाच तर छातीवर तीन टाके टाकण्यात आले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पोतदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, हवालदार लिंबाळे यांनी संबंधित युवतीचा जबाब नोंदवून घेतला.
आरोपीस अटक होत, नाहीतोपर्यंत आंदोलन
दरम्यान, जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत कोळी समाजबांधवांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे, देवीदास कोळी व इतर समाजबांधवांनी सहभाग घेतला असून यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणाबाजी देण्यात आली. दरम्यान, पोलीस निरीक्षक देवीदास भोज व पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत हे आरोपीस अटक करण्यासाठी गेले असून रात्री उशीरापर्यंत त्यास अटक झालेली नव्हती. आणि ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सुरुच होते.