गीता गवळी यांच्या कारवर तरुणांचा हल्ला
By admin | Published: October 16, 2014 05:22 AM2014-10-16T05:22:38+5:302014-10-16T05:22:38+5:30
भायखळ्यातील अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार गीता गवळी यांच्या बीएमडब्ल्यू कारवर दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात तरुणांनी हल्ला केला.
मुंबई : भायखळ्यातील अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार गीता गवळी यांच्या बीएमडब्ल्यू कारवर दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात तरुणांनी हल्ला केला. हल्ला झाला त्या वेळी त्या गाडीतच होत्या. हल्लेखोरांनी दगड व लोखंडी रॉडने चहूबाजूने गाडीची तोडफोड केली. सुदैवाने गीता यातून बचावल्या. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.
मतदानाच्या दिवशी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास भायखळ्याच्या वॉर्ड क्रमांक २०२ च्या आवारात कारवर दगडफेक करण्यात आली असून यात माझ्या एका कार्यकर्त्याच्या हाताला मार लागल्याची माहिती गीता गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या प्रकरणी आयपीसी कलम १४९ (बेकायदापणे एकत्रित येणे, शिक्षा सहा महिने), १४५ (बेकायदा कृत्य करण्यासाठी सतत एकत्र येणे, दोन वर्षांची शिक्षा), १४९ (बेकायदापणे कृत्य करणाऱ्या जमावात सहभागी होणे, शिक्षा सहा महिने), ५०४ (शांतताभंग करणे, दोन वर्षांची शिक्षा), ५०६ (गुन्हेगारी हेतू, दोन वर्षांची शिक्षा) आणि ४२७ (आर्थिक फसवणूक करणे, दोन वर्षांची शिक्षा) या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)