सरकारला १ महिना वेळ देतो, पण...; मनोज जरांगेंनी आंदोलनाचं पूर्ण स्वरुप बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:57 PM2023-09-12T14:57:52+5:302023-09-12T15:03:06+5:30

मराठा समाजाने वेळ दिला तर सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. ही जबाबदारी त्यांची राहील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Give 1 month time to government for Maratha reservation, but agitation will continue - Manoj Jarange Patil | सरकारला १ महिना वेळ देतो, पण...; मनोज जरांगेंनी आंदोलनाचं पूर्ण स्वरुप बदललं

सरकारला १ महिना वेळ देतो, पण...; मनोज जरांगेंनी आंदोलनाचं पूर्ण स्वरुप बदललं

googlenewsNext

जालना – सरकारला आपण ४० वर्ष वेळ दिलाय, आता सरकार १ महिन्याचा वेळ मागतंय, हा १ महिना कशासाठी हवाय याचे उत्तर सरकारने द्यावे. मराठ्यांना टिकणारे आरक्षण देऊ असं सरकार म्हणतंय. आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. परंतु तुम्ही ही प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबवणार हे सांगावे. मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. कुणी कितीही विरोध करून आरक्षण मिळालेच पाहिजे, मी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावली आहे अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणावरील तज्ज्ञांचे, कायदे अभ्यासक सर्वांचे म्हणणं आहे की, आरक्षणाची लढाई लहान नाही. ही खूप मोठी आहे. कायद्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. सरकार म्हणतं आम्ही १ दिवसात जीआर काढतो पण त्याला कुणी चॅलेंज केले तर ते टिकणार नाही. आता वेळ द्यायचा की जीआर काढायचा यावर जनतेने ठरवावे. माझी मनस्थिती द्विधा झाली आहे. तुम्ही मला उत्तर द्यावे. आम्ही अभ्यासक नाही आणि ज्ञानी नाही. मी मरायला तयार आहे. हा मराठ्यांच्या पोरांचा जीवन मरणाचा प्रयत्न आहे. सरकारला एक महिन्याचा वेळ दिला तर ती सरकारची जबाबदारी आणि नाही दिला तर आपली जबाबदारी राहील. मराठ्यांचे खापर आमच्या डोक्यावर फोडू नये. १ महिन्यात आयुष्यभर टिकणारं आरक्षण देतो असं सरकार म्हणते. सर्वपक्षीय ठराव केला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठा समाजाने वेळ दिला तर सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. ही जबाबदारी त्यांची राहील. मी समाजापुढे नाही. आम्ही १ महिना वेळ दिला तर त्याचा अहवाल सकारात्मक येवो अन्यथा नकरात्मक येवो. तुम्हाला राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र ३१ व्या दिवसापासून वाटप करावे लागतील. राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्यावे लागतील असं मी सरकारला सांगितले. सरकारला वेळ दिला तरी मी आंदोलन थांबवणार नाही. आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली. आंदोलन सुरू राहणार जोपर्यंत मराठ्यांना प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत ही जागा सोडणार नाही, मी घरी बसेन हा भ्रम काढून टाका असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत घराचा उंबरठा शिवणार नाही. सगळे संशोधक, अभ्यासक, तज्ज्ञ सरकारला वेळ द्यावा असं म्हणत असेल तर आपण सरकारला हा वेळ द्यावा. मराठ्यांचा पोरांचा घात होऊ नये. प्रक्रियेला वेळ लागेल. ४० वर्ष दिलेत आणखी १ महिना देऊया. आंदोलन सुरूच राहणार, आमरण उपोषण मागे घेऊन आजपासून आंदोलनस्थळी साखळी उपोषण सुरू ठेऊ. जरी १ महिन्याचा वेळ दिला तरी मी आंदोलनस्थळ सोडणार नाही. मराठ्यांना जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्याला पर्याय नाही, अन्यथा आपल्या डोक्यावर खापर फोडले जाईल असं जरांगे यांनी स्पष्ट केले.

...अन्यथा माझी अंत्ययात्रा निघेल

माझ्या जातीला बदनाम करू नये, यासाठी मी २ पाऊले मागे येण्यासाठी तयार आहे. सरकारला १ महिन्याचा वेळ देतो, पण ३१ व्या दिवसापासून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आमरण उपोषण सोडायला तयार आहे. परंतु आंदोलनस्थळ सोडणार नाही. आजपासून साखळी उपोषण सुरू करू. एकतर मराठा आरक्षणाची यात्रा निघेल अन्यथा माझी अंत्ययात्रा निघेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

जनतेचे मत जाणून घेतले

मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडायचे की नाही याबाबत उपस्थित जनतेला मत मागितले. त्यावेळी सर्वांनी एकमुखाने हात वर करून आमरण उपोषण सोडावे अशी भावना व्यक्त केली.  

Web Title: Give 1 month time to government for Maratha reservation, but agitation will continue - Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.