मराठा समाजाला १० टक्के आरक्षण ओबीसीतूनच द्या; जरांगे पाटील : अटक करून तर दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 06:57 AM2024-03-01T06:57:04+5:302024-03-01T06:57:18+5:30
आरक्षण ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा आणि हे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत दिले गेले पाहिजे, अशी भूमिका.
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा आणि हे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत दिले गेले पाहिजे, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत मांडली.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देताना सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाच्या (एसईबीसी) सर्व सवलती या आरक्षणात राहू द्या, अशी मागणीही त्यांनी केली. मला अटक करून दाखवा; मी ज्या जेलमध्ये असेन, ज्या रस्त्याने जाईल त्यावेळी कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील. मराठ्यांची लाट काय असते ते कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
केंद्राचाही फायदा मिळाला पाहिजे
ओबीसीतून आरक्षण दिल्यास माझ्या गोरगरीब मराठा बांधवांना केंद्राच्या नोकऱ्या आणि राज्याच्या नोकऱ्यांचाही फायदा मिळाला पााहिजे, यासाठी आमची ही मागणी आहे, असे जरांगे म्हणाले.