ठिंबकसाठी १०० टक्के अनुदान देणार - सदाभाऊ खोत
By admin | Published: July 14, 2016 08:41 PM2016-07-14T20:41:02+5:302016-07-14T20:41:02+5:30
ऊस पिकाला जादा पाणी लागत असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देऊन जास्तीत जास्त ऊस पिकासाठी ठिंबक सिंचन योजना राबविण्याचे
ऑनलाइन लोकमत
टेंभुर्णी, दि. १४ - ऊस पिकाला जादा पाणी लागत असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देऊन जास्तीत जास्त ऊस पिकासाठी ठिंबक सिंचन योजना राबविण्याचे धोरण आखत आहोत़ यासाठी साखर कारखाने, नाबार्ड व शाासन यांच्या माध्यमातून व चांगल्या कंपन्यामार्फत ठिंबक सिंचनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली़
राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या सदाभाऊ खोत यांनी उजनी टें येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक प्रा़ सुहास पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते़
यावेळी त्यांच्यासमवेत विठ्ठल शुगरचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष दिपक भोसले, जिल्हा संघटक प्रा़ सुहास पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, सातारा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गोपीचंद पडवळकर, जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, कार्याध्यक्ष महावीर सावळे, विजय रणदिवे, एकनाथ सुर्वे, चंद्रकांत गिड्डे, चंद्रकांत कुटे, प्रताप मिसाळ, बळीराम गायकवाड, रूषीकेश बोबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते़
पूर्वीचा शेतकरी नेता आता शासनाचा प्रतिनिधी झाल्यामुळे पूर्वीच्या भूमिकेत बदल होईल असे आपल्याला वाटते का या प्रश्नावर बोलताना सदाभाऊ म्हणाले की, अजिबात नाही़ सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे़ सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे़ म्हणूनच व्यापाऱ्यांनी संप चालू केल्यानंतर मंत्री असूनही मुंबईमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला विकण्यासाठी मी गेलो़
शेतकरी हिताचा निर्णय
खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा शेतकऱ्यांनाही झाला पाहिजे़ शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपल्या मर्जीप्रमाणे फळे व भाजीपाला विक्री करता आली पाहिजे म्हणून बाजार समितीच्या नियंत्रणावरून फळे, भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी गैरसमजातून बंद पुकारला होता़ त्यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय देण्यात आला आहे़ यावर मार्ग काढण्यासाठी समिती नेमण्यात आली असून ६ आॅगस्टपर्यंत अहवाल देण्याच्या सुचना कमिटीस देण्यात आल्या असून शेतकरी, व्यापारी व माथाडी कामगार यांच्या हिताचाच निर्णय होईल असेही पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले़
१०० कोटी खर्चुन ९ किटवेअर
उजनी धरण शंभर टक्के भरले तरी त्यावरील ताण वरचेवर वाढत आहे़ धरणातून शेतीसाठी वर्षभरात चार वेळा पाणी सोडले जाते़ प्रत्येकवेळी १२ टीएमसी पाणी दिले जाते़ पाण्यासाठी धरणातील ४८ टीएमसी पाणी वापरले जाते़ परंतू वर्षभर जोपासलेली पीके जून - जुलै महिन्यात जळू लागतात़ यावर उपाय म्हणून भिमा नदी व सिना नदीवर सुमारे ९ ठिकाणी किटवेअर बांधले तर यामध्ये ३६ टीएमसी पाणी साठणार आहे़ यासाठी १०० कोटी रूपये खर्च येईल असे सांगिल्यानंतर यासाठी आपण पाठपुरावा करू असे पणन राज्यमंत्री खोत यांनी सांगितले़
खोत यांचे ठिकठिकाणी सत्कार
माढा तालुका दौऱ्यात म्हैसगांव, रिधोरे, तांदुळवाडी, कुर्डूवाडी, कुर्डू, पिंपळनेर, टेंभुर्णी, उजनी टें येथे नुतनमंत्री सदाभाऊ खोत यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला़
योजनांचे हेड मिनीमाईज करणार
मी पदभार स्वीकारल्यापासून मिळालेल्या वेळेत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे़ कृषी खात्यात ११५ हेडखाली विविध योजना राबविल्या जात आहेत़ यामध्ये बदल करून ११५ ऐवजी कमीत कमी हेडखाली या योजना राबविण्याचा विचार आहे जेणेकरून कामकाजात सुसुूत्रता येईल व योजना प्रभावीपणे होतील़
वाघ यांच्या कुटुंबियांचे सात्वन
जि़प़ कृषी सभापती पंडीत वाघ यांचे अपघाती निधन झाल्याचे समजताच मंत्री सदाभाऊ खोत यांनी आढेगांव येथे पंडीत वाघ यांच्या निवासस्थानी जावून वाघ कुटुंबियांचे सात्वंन केले़