पालघर परिसराला १६ एमएलडी पाणी द्या
By Admin | Published: March 3, 2017 03:12 AM2017-03-03T03:12:26+5:302017-03-03T03:12:26+5:30
पाण्याच्या कोट्यात १६ एम एल डी इतकी वाढ करावी आणि स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी
पालघर : शहर व आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्याचे मुख्यालय, वाढता लोंढा आणि भविष्यात सिडकोच्या माध्यमातून होणारी नवीन पालघर वसाहत पाहता भविष्यात पाणीपुरवठा अपुरा पडणार असल्याने पाण्याच्या कोट्यात १६ एम एल डी इतकी वाढ करावी आणि स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी अशी मागणी काँग्रेसचे केदार काळे यांनी पालक मंत्र्यांकडे केली आहे.
प्रादेशिक नळपाणी योजनेतून पालघर शहरासह परिसरातील अन्य २६ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेतील २.०० एमएलडी पाणी इतर गावाना व उर्वरित ३.४८ एमएलडी पालघर नगरपरिषदेसाठी उपलब्ध करण्यात आले होते. आजही तेवढेच अपुरे पाणी पालघर शहराला मिळत आहे. शासनाच्या निकषांनुसार नागरी भागासाठी दरडोई ७० लिटर इतक्या पाण्याची गरज असतांना पालघरवासीयांना अपुऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. म्हणून २६ गाव नळपाणी योजनेच्या गावाना दररोज १६ एम एल डी पाणी देण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे केदार काळे ह्यानी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा व खासदार अॅड. चिंतामण वनगांकडे केली .
तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम १९६५ चे कलम ५० अन्वये पाणी पुरवठायोजना तयार करणे नगरपरिषदेला बंधनकारक आहे म्हणून नविन स्वतंत्र योजना फक्त नगरपरिषदेसाठी तयार करण्यात यावी व आसपासच्या गावपाड्यांसाठी वेगळी पाणीपुरवठा योजना करावी अशी ही मागणी काळे यांनी केली आहे. (वार्ताहर)
>लोकसंख्या गेली लाखांवर
२००१ च्या जन गणनेनुसार पालघरची लोकसंख्या ५२ हजार ६७० इतकी असली तरी २०११ च्या जन गणाने नुसार ती ६८ हजार ८८५ इतकी झाली आहे.
तर तरंगती लोकसंख्या पकडून ती १ लाखापर्यंत पोहचली आहे.नळपाणी योजना मंजूर करताना या योजने साठी दररोज ५.४८ एम एल डी पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे.