मराठवाडा, विदर्भासाठी ७५ हजार कोटी द्या; मुख्यमंत्र्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:22 AM2018-09-20T01:22:12+5:302018-09-20T06:46:19+5:30
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष सहाय्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वित्त आयोगापुढे केली.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष सहाय्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वित्त आयोगापुढे केली.
१५ व्या वित्त आयोगापुढे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा हिस्सा १५ टक्के, तर एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा २० टक्के आहे. हे लक्षात घेऊनच मुंबईसाठी ५० हजार कोटींचे विशेष साहाय्य आयोगाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
राज्याच्या ३५१ तालुक्यांपैकी १२५ तालुके मानव विकास निर्देशांकात मागे आहेत. त्यासाठी २५ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
केंद्रीय करात हिस्सा मिळावा
चौदाव्या वित्त आयोगाप्रमाणे केंद्रीय करातील राज्यांचा हिस्सा ४२ टक्के आहे तो पंधराव्या वित्त आयोगात ५० टक्के इतका करावा अशी शिफारस राज्य शासनाने आयोगाकडे केली आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे केंद्रीय कर संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे.