'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 02:08 PM2020-08-07T14:08:43+5:302020-08-07T14:17:01+5:30

काकांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास कुस्तीसह क्रीडा क्षेत्रातील अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जातील.

Give 'Arjunveer' Kaka Pawar a chance in the Vidhan Parishad; Demand from wrestler to Sharad Pawar | 'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी

'अर्जुनवीर' काका पवारांना विधानपरिषदेवर संधी द्या; शरद पवारांकडे पैलवान मंडळींची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात काका पवार हे नाव चर्चेत

पुणे(शेलपिंपळगाव) : राज्यपाल नियुक्त खेळाडू कोट्यातून अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका पवार यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी अशी मागणी कुस्तीक्षेत्रातील तमाम पैलवान मंडळींकडून केली जात आहे. यापार्श्वभूमीवर रोहा (रायगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा जेष्ठ नेते शरद पवार यांची काका पवारांनी भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या समवेत महाराष्ट्र केसरी पै. दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी पै. दिलीप भरणे, आशियाई सुवर्णपदक विजेते पै. रवींद्र पाटील उपस्थित होते.
         महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात काका पवार हे नाव अगदीच चर्चेत आहे. ज्या महाराष्ट्रात शे - दीडशे किलो वजन, सहा सव्वासहा फूट उंच असणाऱ्या व्यक्तीलाच पैलवान म्हणावे, अशी प्रथा होती. त्या महाराष्ट्रात ५० - ५५ वजनाचा माणूस सुद्धा पैलवान होऊ शकतो आणि देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवू शकतो असा इतिहास काका पवारांनी रचला आहे. गोकुळ वस्ताद तालमीत हरिश्चंद्र बिराजदारांच्या मार्गदर्शनाखाली काका पवार एशियाड कुस्ती स्पर्धेत खेळले असून राष्ट्रकुल सारख्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात देशाला तब्बल ३२ पदके मिळवून त्यांनी इतिहास रचला आहे. काकांच्या यशस्वी खेळाबद्दल केंद्र सरकारने "अर्जुन पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव केला आहे. 


             कुस्ती निवृत्तीनंतर गरीब आणि गरजू मल्लांना घडविण्यासाठी कात्रजमधील जांभुळवाडी येथे स्वतःच्या मालकीच्या जागेत 'आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल' नावाने तालीम चालू केली. आपल्या गुरुने आपल्याला दिलेले ज्ञान पुढच्या पिढीला देण्यासाठी त्यांनी आयुष्य वाहिले. आजही राज्यातील अनेक मल्लांना काका कुस्तीचे धडे देत डाव - प्रतिडाव शिकवत आहेत. राहुल आवारे, विक्रम कुऱ्हाडे यांसारखे जागतिक दर्जाचे मल्ल त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत. 
         विशेष म्हणजे काकांकडून कुस्तीचे धडे गिरवलेल्या पंधरा पैलवानांना 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार' मिळाला आहे. तर राहुल आवारे यांसारखा पैलवान पोलीस उपअधीक्षक अशा क्लास वन पदावर नोकरी करत आहे. तसेच काकांच्या तालमीतील किमान ५० ते ६० पैलवान केंद्र सरकारच्या रेल्वे खात्यात नोकरी करत आहेत. मैदानी कुस्तीमध्ये किरण भगत सारखा मल्ल त्यांनी घडवला आहे. चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी नाशिकचा हर्षल सदगीर व उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके हे दोन्ही मल्ल काकांच्याच तालमीत तयार झाले आहेत.  
           आपल्या हातात जितके आहे; तितकी मदत काका प्रत्येक पैलवानांना करत आले आहेत. त्यामुळे काकांसारखी व्यक्ती राज्यपाल कोट्यातून खेळाडू आमदार म्हणून नियुक्त व्हावी. काकांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास कुस्ती सारख्या खेळाच्या अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जातील. ज्यामुळे अनेक सुविधांपासून वंचित असणाऱ्या खेळाला न्याय मिळेल अशी अपेक्षा पैलवान मंडळींकडून केली जात आहे.

Web Title: Give 'Arjunveer' Kaka Pawar a chance in the Vidhan Parishad; Demand from wrestler to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.