बँकांना व्यवस्थापन निर्णयाचे स्वातंत्र्य देणार
By admin | Published: January 4, 2015 02:01 AM2015-01-04T02:01:32+5:302015-01-04T02:01:32+5:30
बँकींग क्षेत्राला अनुत्पादित खात्यांच्या (एनपीए) ताणातून मुक्त करण्यासाठी बँकींग धोरणात ठळक बदल करण्यात येणार आहेत.
पुणे : बँकींग क्षेत्राला अनुत्पादित खात्यांच्या (एनपीए) ताणातून मुक्त करण्यासाठी बँकींग धोरणात ठळक बदल करण्यात येणार आहेत. बँकांना व्यवस्थापनात अधिक व्यावसायिककता यावी या साठी निर्णयाचे स्वातंत्र्य देण्यात येईल. तसेच गुणवत्तेचा सन्मान व व्यावसायिक निर्णयांची अंमलबजावणी तत्काळ होण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी केले.
ज्ञानसंगम परिषदेच्या उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते़ जेटली म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था एका कठीण काळातून जात आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेला कलाटणी देण्याच्या दृष्टीने होत असलेले हे विचारमंथन अतिशय महत्त्वाचे आहे. सार्वजनिक बँकांसमोर मोठी आव्हाने आहेत. अनुत्पादित कर्जाचे मोठे संकट बँकींग क्षेत्रावर आहे. यातून बाहेर पडण्यासाठी काही नियम तयार करावे लागतील़ बँकांना व्यावसायिकतेने काम करता यावे यासाठी निर्णयाचे स्वातंत्र्य दिले जाईल. या शिवाय गुणवत्तेचा सन्मान करण्याची भूमिका ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी चांगल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत होणारा उशीर टाळण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)