मृत्युदंडाऐवजी जन्मठेप द्या!
By admin | Published: July 26, 2015 02:16 AM2015-07-26T02:16:53+5:302015-07-26T02:16:53+5:30
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर याकूब मेमनची पत्नी आणि मुलीने पहिल्यांदाच मौन सोडत याकूबला सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर याकूब मेमनची पत्नी आणि मुलीने पहिल्यांदाच मौन सोडत याकूबला सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची याचना केली आहे. याकूबची पत्नी राहीन आणि मुलगी झुबेदा हे गेली अनेक वर्षे प्रसिद्ध माध्यमांना टाळत आल्या. अॅड. श्याम केसवाणी यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी या दोघी माय-लेकींनी पहिल्यांदाच मनमोकळे केल.
आम्ही स्वत:हून दुबईहून भारतात परतलो. आम्ही काहीही चुकीचे केलेले नसल्याने आम्ही परतलो, असे राहिन म्हणाल्या. अनेक वर्षे आम्ही खूप सोसले. भारत सरकारने दया दाखवित मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलावी. फेरविचार याचिकेबाबत त्याला कमालीची आशा होती, असे सांगून राहिन म्हणाल्या की, राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर अजूनही त्याचा भरवसा आहे. त्याला अजूनही खात्री वाटते. अल्ला आणि सरकारवर त्याची अपार विश्वास आहे.
दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत आहे. तो मानसिक रुग्णही आहे. दुसऱ्यांच्या पापाची तो किंमत मोजत आहे. प्राण्यांनाही इजा न करणारा याकूब माणसांचे बळी कसा घेईल, असा सवाल त्यांनी केला.
याकूबच्या आईची (हनिफा) प्रकृती ठीक नाही. माझ्या मृत्यूआधी किमान एकदा तरी याकूब भेटायला येईल, असे तिला वाटते. आम्ही भारतात परतलो तेव्हा माझी मुलगी (झुबेदा) २५ दिवसांची होती. आज तिचे वय २० वर्षे आहे. तिने एक दिवसही वडिलासोबत घालविला नाही, असे राहीन म्हणाल्या.
१माझ्या वडिलांबाबत जे काही घडत आहे, त्यामुळे मी कमालीची अस्वस्थ आहे. मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, त्या दिवसापासून मला झोपच लागली नाही. या वेळी मी तुरुंगात त्यांची भेट घेतली तेव्हा माझे वडील म्हणाले की, या गोष्टींचा विचार न करता फक्त अभ्यासावर लक्ष दे. ते खूपच दु:खी होते; परंतु, त्यांनी मला सकारात्मक राहण्यास सांगितले. ते सद्गृहस्थ आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे, असे झुबेदा म्हणाली.
२ते देशाभिमानी आहेत. ते नेहमीच खिशात सद्वचने बाळगतात. आम्हा सर्वांंची एकच याचना आहे की, त्यांची शिक्षा कमी करावी, राजकारण मला कळत नाही; माझे वडील बाहेर यावेत, एवढीच माझी इच्छा आहे, असे झुबेदा सांगत होती.
३या वेळी याकूबचा जवळचा नातेवाईक उस्मान उपस्थित होता. सरकार आणि कोर्टाबाबत भेदभाव नाही. आम्ही कोणत्याही ओवैसीसोबत नाही. आम्हांला याकूबच्या फाशीबाबत कळविण्यात आले आहे. माहीममधील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी याकूब आर्थिक मदत करायचा. तुरूंगात राहूनही त्याने एमए केले, तसेच अनेकांना १०वी आणि १२वी पास होण्यासाठी मदतही केली, असे उस्मान होता.
४याकूबच्या अवस्थेला सीबीआयचे सह-संचालक ओ.पी. चटवाल हे जबाबदार असल्याचे अॅड. श्याम केसवाणी यांनी सांगितले. १९९४मध्ये चटवाल यांनी मला असे सांगितले होते की, पाकिस्तानविरुद्ध पुरावे मिळविण्यासाठी याकूबने खूप मदत केली. त्यांनीच मला जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. सीबीआय विरोध करणार नाही, असे ते म्हणाले होते; परंतु, जामीन अर्ज दाखल केल्यानंतर सीबीआयमधील एका दक्षिण भारतीय वकिलाने विरोध केला, असे केसवाणी यांनी या वेळी सांगितले.