क्षारपडची नुकसानभरपाई देऊ -जलसंपदा मंत्री
By Admin | Published: August 6, 2016 05:01 AM2016-08-06T05:01:01+5:302016-08-06T05:01:01+5:30
क्षारपडचा धोका रोखण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांचे क्षारपडमुळे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जमीनीला उद्भवलेला क्षारपडचा धोका रोखण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांचे क्षारपडमुळे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, याचा गांभीर्याने विचार करुन राज्य सरकारतर्फे निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना दिली.
शिरोळचे उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, सुजित मिणचेकर आदींनी लक्षवेधीद्वार शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीचा विषय उपस्थित केला. तालुक्यातून वाहणाऱ्या चारही नद्या बारमाही वाहत असल्याने काळी कसदार जमीनीतील पाणी निचऱ्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ५३ गावांपैकी ३३ गावातील पूर्णत: क्षारपड ३१६४ हेक्टर जमीनीतील पिकांचे नुकसान होत आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उल्हास पाटील यांनी केली. यासंबंधातील भरपाई देण्याचे निकष खास बाब म्हणून बदलण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली.
त्यावर मंत्री महाजन यांनी सांगितले की , सरकारी योजनांमुळे जर शेतजमीन क्षारपड झाली असेल तर त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. परंतु शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीनीला खासगी तसेच सहकारी पाणी उपसा सिंचन योजना आहेत, त्यामुळे भरपाई देता येत नाही. तरीही जिल्हा परिषदेच्या मार्फ त शेतजमिनीच्या बाजूने चरी, नाले तयार करण्याचे प्रयत्न केले जातील. नुकसान भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मंत्री म्हणाले.