काँग्रेसला एकहाती सत्ता द्या
By admin | Published: October 13, 2014 10:33 PM2014-10-13T22:33:32+5:302014-10-13T23:04:54+5:30
पृथ्वीराज चव्हाण : रामानंदनगर येथे पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ सभा
किर्लोस्करवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहंकारामुळे आघाडी फुटली. मात्र आघाडीमुळे राज्याचे नुकसान होत असल्याने काँग्रेस पक्षालाचा एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रचारार्थ रामानंदनगर (ता. पलूस) येथील सभेत ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी झाली. राष्ट्रवादीशी आघाडी करू नये असाच सर्वत्र सूर होता. मात्र जनतेमध्ये वेगळा संदेश जाऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र भाजपने शिवसेनेशी युती तोडल्याची घोषणा करताना राष्ट्रवादीमध्येही अहंकार निर्माण झाला. सरकारचा पाठिंबा काढून राष्ट्रवादीने एकप्रकारे १५ दिवसांकरिता केंद्रातील भाजपच्याच हातात राज्याची सत्ता दिली आहे.
ते म्हणाले की, विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील सर्व प्रश्न सोडवून महाराष्ट्राशी एकी राखली. मात्र स्वतंत्र विदर्भ, केंद्रशासित प्रदेश म्हणून मुंबई, असा कुटिल डाव केंद्रातील भाजप सरकारचा आहे. महाराष्ट्राची फाळणी करण्याचा भाजपचा हा कुटिल डाव त्यांचा पराभव करून जनता उधळून लावेल.
पतंगराव कदम म्हणाले की, राष्ट्रवादीतील सर्व भ्रष्ट उमेदवार भाजपला मिळाले आहेत. मात्र जिल्ह्यात आठ पैकी पाच आमदार काँग्रेसचे असतील. गेल्या निवडणुकीपेक्षा आपला यावेळेला दुप्पट मताधिक्याने विजय निश्चित आहे. यावेळी मानसिंग बँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, सभापती यास्मिन पिरजादे, माजी सरपंच जयसिंगराव नावडकर यांची भाषणे झाली. सभेस मोहनराव कदम, महेंद्र लाड, गणपतराव सावंत-पाटील, सर्जेराव पवार, सरपंच वार्इंगडे, माजी सरपंच प्रल्हाद सिताफे, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, अकबर नदाफ, श्रीकांत लाड, उपसरपंच कोल्हापुरे, डॉ. डी. डी. माने, प्रशांत नलावडे, अख्तर पिरजादे, मीनाक्षी सावंत, श्वेता बिरनाळे, ऋषिकेश लाड, सुधीर जाधव उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच जयसिंगराव नावडकर यांचा सत्कार डॉ. कदम यांच्याहस्ते झाला. (वार्ताहर)