सरकारी रुग्णालयातील त्रुटींचा तपशील द्या-हायकोर्ट
By admin | Published: April 7, 2017 06:07 AM2017-04-07T06:07:48+5:302017-04-07T06:07:48+5:30
तालुका स्तरापासून सर्व सरकारी व महापालिका रुग्णालयांत डॉक्टरांच्या सुविधा व सुरक्षेमध्ये त्रुटी आहेत.
मुंबई : तालुका स्तरापासून सर्व सरकारी व महापालिका रुग्णालयांत डॉक्टरांच्या सुविधा व सुरक्षेमध्ये त्रुटी आहेत. त्याबाबत राज्य सरकारने तपशील सादर करावा. त्याशिवाय मार्डनेही निवासी डॉक्टरांच्या संबंधित असलेल्या असुविधांविषयी माहिती सादर करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. तसेच डॉक्टरांना मारहाण केलेल्या धुळे व ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेजही उच्च न्यायालयाने मागवले आहे.
गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने जे. जे., केईएम, सायन, नायर, मिरज व आंबेजोगाई या सरकारी रुग्णालयांत निवासी डॉक्टरांची राहण्याची व कामाच्या ठिकाणाबाबत तपशिलात माहिती देण्याचे निर्देश सरकार व महापालिकेला दिले होते.
त्यानुसार गुरुवारच्या सुनावणीत पालिकेच्या वकिलांनी डॉक्टरांच्या राहण्याची सोय चांगली नसल्याचे कबूल केले. मात्र पालिका याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे सांगितले. सरकारी वकील मिलिंद मोरे यांनीही निवासी डॉक्टरांच्या राहण्याची सोय नीट नसल्याचे मान्य केले. त्यावर न्यायालयाने तालुका स्तर ते सरकारी व पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या राहण्याची, कामाच्या ठिकाणाची, कॅन्टीन सुविधेतील त्रुटींची माहिती २४ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रत्येक रुग्णालयात वेगवेगळ्या गोष्टींची कमतरता असेल. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाची तपशीलवार, स्वतंत्र माहिती द्या,’ असे निर्देश न्यायालयाने दिले. (प्रतिनिधी)