वृद्ध आईला पोटगी द्या!
By admin | Published: March 3, 2016 04:56 AM2016-03-03T04:56:59+5:302016-03-03T04:56:59+5:30
७२ वर्षीय वृद्ध आईला तिचा उदरनिर्वाह, औषधोपचाराचा खर्च करता यावा, यासाठी दोन्ही मुलांनी पाच हजार व २५०० रुपये, अशी एकूण ७५०० रुपयांची पोटगी द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल पंढरपूर
पंढरपूर : ७२ वर्षीय वृद्ध आईला तिचा उदरनिर्वाह, औषधोपचाराचा खर्च करता यावा, यासाठी दोन्ही मुलांनी पाच हजार व २५०० रुपये, अशी एकूण ७५०० रुपयांची पोटगी द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल पंढरपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. माने यांनी दिला आहे.
गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी पवार (वय ७२) या वयोवृद्धेने तिच्या मुलांविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. थोरला मुलगा सुभाष पवार (वय ४३) याच्या नावे २७ एकर तर धाकटा भीमरावच्या (वय ४१) नावे ११ एकर बागायती शेतजमीन असूनही ही दोन्ही मुले आईचे संगोपन करत नाहीत. उदरनिर्वाह व औषधोपचारासाठी पैसे मागितल्यास त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळते. घरातून बाहेर काढले जाते, अशी तिची तक्रार होती.
दोघांच्या नावे असलेल्या शेतजमिनीमध्ये ते वर्षाला ऊस, मका, गहू आदी पिके घेतात. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न १२ ते १५ लाखांच्या आसपास आहे. सक्षम परिस्थिती असूनही ते संगोपनास टाळाटाळ करीत असल्याचे वृद्ध आईने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
वृद्ध आईची मागणी मान्य करत थोरला मुलगा सुभाष यांनी प्रतिमहा पाच हजार तर धाकटा भीमराव याने २५०० रूपये भत्ता द्यावा, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. माने यांनी दिला आहे. वृद्ध महिलेतर्फे अॅड. आर. बी. घोगरदरे यांनी न्यायालयात कामकाज पाहिले.