३० लाख विहिरींचे पुरावे द्या - राज ठाकरे
By admin | Published: April 21, 2016 03:22 AM2016-04-21T03:22:59+5:302016-04-21T03:22:59+5:30
रोजगार हमी योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून व्यवसायकर वसूल करीत आहे
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : रोजगार हमी योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून व्यवसायकर वसूल करीत आहे. या पैशांचा शासनाने काय विनियोग केला, याची माहिती दिली पाहिजे. राज्य शासन ३० लाख विहिरी बांधल्याचा दावा करीत आहे. या विहिरींचे पुरावे त्यांनी दिले पाहिजेत, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
लातूर येथील न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट व येडोळा शिवारात मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या समवेत माजी आ. बाळा नांदगावकर, मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते नितीन देसाई, एसटी कामगार सेनेचे अविनाश अभ्यंकर यांच्यासह स्थानिक पदाधिरी उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून मी ३० लाख विहिरींचा हिशोब मागतो आहे. मात्र, शासनाने अद्यापपर्यंत एकही पुरावा दिला नसल्याचे सांगत नागरिकांकडून कर रूपाने जमा केलेल्या पैशांचा सरकारने हिशेब दिला पाहिजे. तसेच या पैशातून नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तुळजापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर जळकोट येथे मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या ओढा पात्राच्या रुंदीकरण, खोलीकरण व पुनरूज्जीवनाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटीजवळ मोरे पुलाच्या नाल्याची बांध-बंदिस्ती व येडोळा गावाजवळील बोरी नदीपात्राच्या रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली.