CoronaVirus News: जादा लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही द्या - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 02:56 AM2021-04-09T02:56:01+5:302021-04-09T02:56:35+5:30
आता केंद्राने लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन सिलिंडर तसेच व्हेंटिलेटरदेखील उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
मुंबई : संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्र या लढ्यात मागे नव्हता आणि मागे राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून, आणखीही वाढविण्यात येत आहेत. आता केंद्राने लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन सिलिंडर तसेच व्हेंटिलेटरदेखील उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली. ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागांतून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबाच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोस मिळाले आहेत. आजपर्यंत ९२ ते ९५ लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून, काही केंद्रे बंद पडली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के अँटिजेन टेस्ट होतात. हे प्रमाण समाधानकरक असले तरी वाढवावे, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
हाफकिनमध्ये लस उत्पादनासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता द्या. २५ वर्षे वयावरील प्रत्येकाला लस देण्याची अनुमती द्या. जादा १२०० व्हेंटिलेटर द्यावेत, आदी मागण्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्या.
कोरोना लढ्यात राजकारण नको : सर्वांना द्या समज
कोरोनाच्या लढ्यात कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये अशी समज आपण सर्व पक्षांना द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. राज्यात भाजप या मुद्यावर राजकारण करीत असल्याचे एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.