मदत द्या; नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही!
By admin | Published: November 22, 2015 02:48 AM2015-11-22T02:48:40+5:302015-11-22T02:48:40+5:30
केंद्रीय पथकाच्या तिसऱ्या दुष्काळी दौऱ्यातूनही राज्याला मदत मिळण्याची सूतराम शक्यता नाही. मदतीबद्दल दिरंगाई आणि चालढकल अशीच सुरू राहिल्यास राज्यातील
मुंबई : केंद्रीय पथकाच्या तिसऱ्या दुष्काळी दौऱ्यातूनही राज्याला मदत मिळण्याची सूतराम शक्यता नाही. मदतीबद्दल दिरंगाई आणि चालढकल अशीच सुरू राहिल्यास राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मंत्र्यांना फिरणे कठीण होईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी दिला.
केंद्रीय कृषिमंत्री, मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने वारंवार पाहणीदौरे करूनही मराठवाडा व राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती काही लागलेले नाही. आता केंद्रीय पथकाकडून मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागाचा पुन्हा पाहणीदौरा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मुंडे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, हेमराज शहा उपस्थित होते.
मुंडे या वेळी म्हणाले, अशा धावत्या पाहणीदौऱ्यात जनता कंटाळली असून, त्यामुळे पथकाला जागोजागी रोषाला सामोरे जावे लागत आहे.
दुष्काळी भागाचे वारंवार पाहणीदौरे व त्यांचे अहवाल सादर करूनही केंद्र व राज्याकडून जनतेला मदत मिळत नाही.
सध्याच्या राज्यकर्त्यांना एकतर महाराष्ट्रातला दुष्काळ कळला नाही किंवा मदत मिळवण्याइतकी या राज्यकर्त्यांची दिल्लीत पोच नाही, त्यामुळे महाराष्ट्राचे मात्र नुकसान होत आहे, असेही मुंडे म्हणाले.
(प्रतिनिधी)