इंदु मिलचा निधी वाडिया रुग्णालयाला द्या : प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 08:42 PM2020-01-18T20:42:07+5:302020-01-18T20:42:29+5:30

‘नाईट लाईफ’ हवीच

Give Indu Mill funds to Wadia Hospital: Prakash Ambedkar | इंदु मिलचा निधी वाडिया रुग्णालयाला द्या : प्रकाश आंबेडकर 

इंदु मिलचा निधी वाडिया रुग्णालयाला द्या : प्रकाश आंबेडकर 

googlenewsNext
ठळक मुद्देस्मारकामध्ये स्कुल ऑफ थॉट्स उभारा

पुणे : ‘इंदु मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, हे अपेक्षित नाही. त्यामुळे पुतळा व सुशोभिकरणासाठी शासनाने दिलेला सर्व निधी मुंबईतील वाडिया रुग्णालयाला द्यावा,’ अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यालाच विरोध दर्शविला आहे. 
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. इंदु मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची साडेतीनशे फुटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने मुंबईतील वाडिया रुग्णालयासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान शासनाला खडे बोल सुनावले.पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत, मात्र आरोग्यसेवेसाठी नाहीत. पुतळे महत्वाचे आहेत की रुग्णालये, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. न्यायालयाची ही भुमिका योग्य असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 
ते म्हणाले, इंदु मिलची जागा पुतळ्यासाठी देण्यात आलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा ‘इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीज’साठी दिली होती. देशाला आज आंतरराष्ट्रीय राजकारणातील विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ही जागा बौध्दिक गोष्टींसाठीच वापरायला हवी. याबाबत वायपेयी यांच्याशी चर्चा झाली होती. त्यासाठीच त्यांनी जागा दिली. त्यामुळे या जागेत ‘स्कुल फ थॉट्स’ची उभारणी करायला हवी. इंदु मिलच्या जागेवर सुरू असलेले सुशोभीकरण व पुतळ््यासाठी शासनाने दिलेला सर्व निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा. तसा आदेशच न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी आंबेकडर यांनी केली. 
------------------
नाईट लाईफ’ हवीच
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफच्या भुमिकेचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी समर्थन केले आहे. ‘मी स्वत: नाईट लाईफचे आयुष्य जगलो आहे. महानगरांसह ज्या शहरांमध्ये दिवसा आठ ते दहा तासांचे काम करावे लागते, तिथे लोकांना दिवसा सामाजिक आयुष्यच नसते. त्यांना दिवसा वेळच मिळत नाही. त्यांना रात्रीच्या वेळ हे आयुष्य जगता यायला हवे. त्यामुळे नाईट लाईफला माझा पाठिंबा आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
--------------
केंद्र सरकारे दारूड्यासारखे
‘‘दारूड्याला मद्यपानासाठी पैसे मिळाले नाहीत की तो घरातील सर्व साहित्य विकायला सुरूवात करतो. तसे केंद्र सरकारने महसुली तुट भरून काढण्यासाठी भारत पेट्रोलियम ही अंडे देणारे कोंबडी तसेच इतर संस्था विकायला काढल्या आहेत. त्यामुळे हे सरकार दारूड्यासारखे वागत आहे,’’ अशी टीका अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली.

...............

‘महाराष्ट्र बंद’ची हाक
वंचित बहुजन आघाडीने एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात  २४ जानेवारीला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. ‘‘भाजपा, आरएसएससह काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्ष केवळ मुस्लिम समाजालाच फटका बसणार असल्याचे सांगत आहेत. हिंदुंनाही याचा फटका बसणार असल्याची भूमिका मीच मांडत आहे,’’ असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

Web Title: Give Indu Mill funds to Wadia Hospital: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.