दोन दिवसांच्या आत जागा वाटपाची माहिती द्या, 'वंचित'चं महाविकास आघाडीला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 06:58 PM2024-02-24T18:58:03+5:302024-02-24T19:37:48+5:30
Prakash Ambedkar’s VBA writes letter to MVA leaders : महाविकास आघाडीने दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय जाहीर करावा, असे पत्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र लिहिले आहे.
Prakash Ambedkar’s VBA writes letter to MVA leaders : (Marathi News) मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. मात्र, याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. अशातच लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय जाहीर करावा, असे पत्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रावर वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर आणि रेखा ठाकूर यांची स्वाक्षरी आहे.
वंचित बहुजन आघाडीने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची 22 फेब्रुवारीला पत्रकार परिषद झाली. ती आम्ही बघितली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये 39 जागांवर एकमत झाले असून, लवकरच 27 किंवा 28 फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले होते. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले होते की, काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित 39 कलमी अजेंडा स्वीकारला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.
किमान समान कार्यक्रमासाठी आमच्या प्रस्तावित 39-पॉइंट अजेंडावर काँग्रेसने स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना किमान समान कार्यक्रमासाठी त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएसचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी मविआतील तिन्ही पक्षांच्या मसुद्यासह एक किमान समान कार्यक्रम तयार करणे महत्वाचे आहे, असे वंचित बहुजन आघाडीने पत्रात म्हटले आहे.
याचबरोबर, वंचिक बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेतील त्यांच्या विधानांचा पुनरुच्चार या पत्रात करण्यात आला आहे. मविआने वंचित बहुजन आघाडीला आत्तापर्यंत अंतिम झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती द्यावी. 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आमच्या शेवटच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केली होती. मविआकडून वंचितला तीन पक्षांमध्ये झालेल्या जागा वाटपाची माहिती मिळाल्यास तीन पक्षांना वैयक्तिकरीत्या किती जागा लढवण्यासाठी दिलेल्या आहे, ते समजण्यात मदत होईल. त्यामुळे त्या संबंधित पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी काही जागांसाठी वाटाघाटी करू शकेल. उदाहरणार्थ जर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेस/राष्ट्रवादी/शिवसेना यांना दिला गेला असेल, तर आम्ही मुंबई दक्षिण ज्या पक्षाला दिला गेला आहे त्या पक्षाशी वाटाघाटी करू. पण वाटाघाटी होण्यासाठी कोणत्या पक्षाला त्यांच्या कोट्यातील कोणता मतदारसंघ मिळाला, हे समजणे महत्त्वाचे आहे, असं मत पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तीन पक्षांतर्गत तुमच्या ठरलेल्या जागांबद्दल आम्हाला कोणत्याही प्रसारमाध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून याबाबत माहिती मिळाल्यास जागा वाटप शक्य तितक्या लवकर सोडवले जाऊ शकते. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी, म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. ही डेडलाइन नाही पण आमच्या सोयीसाठी हे आवश्यक आहे. जेणेकरुन आम्हाला कोणाशी चर्चा करायची आहे हे समजू शकेल, असेही पत्रात म्हटले आहे.