सातबारा तेथे विहीर द्या!
By Admin | Published: March 4, 2015 01:58 AM2015-03-04T01:58:55+5:302015-03-04T01:58:55+5:30
सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते रोखण्यासाठी शासनाने सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,
यवतमाळ : सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते रोखण्यासाठी शासनाने सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेथे सातबारा तेथे विहीर हे सूत्र सरकारने लागू करावे, अशा शब्दांत पिंपरी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना साकडे घातले.
यवतमाळ येथे विभागीय आढावा बैठक आणि रातचांदणा व घोडखिंडी या गावांच्या भेटी आटोपून मुख्यमंत्री रात्री १० वाजता पिंपरी बुद्रुक या गावात मुक्कामासाठी पोहोचले. येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याची संपूर्ण मुभा दिली गेली होती. शेतकरी म्हणाले, खासदार-आमदारांना पेंशन मिळते, मोलकरणीलाही १० हजार रुपये पेंशन दिले जाते. मग शेतकऱ्यांवरच शासनाचा अन्याय का ?, शेतकऱ्यांनाही शासनाने पेंशन लागू करावे. शेततळे आणि बंधारे बांधून शेतकऱ्यांंना कोणताही फायदा होत नाही, त्याऐवजी प्रत्येक शेतात विहीर देऊन सिंचनासाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, किमान दिवसातरी पूर्णवेळ वीज कृषिपंपाला मिळावी अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतमालाला खर्चावर आधारित हमी भाव, सोयाबीन, कापूस यावर प्रक्रिया उद्योग, दीर्घ मुदती बिनव्याजी कर्ज आदी मागण्या यावेळी ठेवण्यात आल्या.
सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या पिंपरी गावात मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल दहा घरी ही व्यवस्था केली गेली. यातील नेमक्या कोणत्या घरी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम राहील, हे स्पष्ट नव्हते. या सर्वच घरी मुख्यमंत्र्यांसाठी साध्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री ज्या घरी मुक्काम करेल, अगदी त्याच्या बाजूच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली गेली होती. पिंपरी हे गाव नियमित भारनियमनाचा सामना करते. मात्र, मंगळवारी वीज पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी महावितरणने घेतल्याचे दिसून आले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. या गावातील रस्त्यांची स्थिती चांगली आहे. गावाचे पोलीस पाटील पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. शेजारील हदगावच्या पोलीस पाटलाकडे पिंपरीचा अतिरिक्त
प्रभार आहे. प्राथमिक शाळेच्या पटांगणात मुख्यमंत्र्यांसाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. (प्रतिनिधी)