नितीन आगेला न्याय द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:05 AM2017-12-11T04:05:20+5:302017-12-11T04:05:46+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावी २०१४ साली अमानुषपणे हत्या झालेल्या दलित तरुण नितीन आगेला न्याय देण्याची मागणी करत, आता विद्यार्थी भारती संघटनाही मैदानात उतरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावी २०१४ साली अमानुषपणे हत्या झालेल्या दलित तरुण नितीन आगेला न्याय देण्याची मागणी करत, आता विद्यार्थी भारती संघटनाही मैदानात उतरली आहे. पोलीस आणि सरकारी वकिलांच्या निष्काळजीमुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात सरकारने या प्रकरणी गंभीरतेने लढा देण्याची मागणी करत, विद्यार्थी भारती संघटनेचे कार्यकर्ते सोमवारपासून आझाद मैदानात उपोषणास बसणार आहेत.
गावातील उच्च जातीतील लोकांनी नितीनला मारून टाकले आणि गावात झाडावर लटकवले. नितीनला न्याय मिळावा, म्हणून संघटनेने दादरच्या चैत्यभूमी येथे ६ डिसेंबरला सह्यांची मोहीम राबविली. हजारो सह्या नितीन आगेसाठी घेण्यात आल्या असून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे, तसेच हा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालविण्यात यावा, यासाठी संघटनेतर्फे सकाळी १० ते ५ या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.