दैव देते, कर्म नेते !
By admin | Published: February 5, 2017 01:07 PM2017-02-05T13:07:28+5:302017-02-05T13:07:28+5:30
एबी फॉर्म मिळूनही अपक्ष राहण्याची वेळ
नाशिक : महापालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासून तीन महिने अगोदर प्रभागाची रचना व त्यावर पडणाऱ्या आरक्षणाच्या विवंचनेत राहणाऱ्या इच्छुकांनी बदलत्या राजकीय हवेचा अंदाज घेत उमेदवारीसाठी पक्षांतर केले खरे, पण अशा पक्षांतरामुळे काहींना पक्षाची अधिकृत उमेदवारीही मिळाली. परंतु एबी फॉर्ममधील त्रुटी व अर्ज भरण्याची टळून गेलेली मुदत पाहता ‘दैव देते, कर्म नेते’ अशी म्हणण्याची अनेकांना वेळ आली.
नाशिक महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच या निवडणुकीचा अंदाज बांधून असलेल्या इच्छुकांनी आपली रणनिती ठरवून घेतली होती. चार सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने पॅनलमध्ये कोण असावे येथपासून ते कोणत्या प्रवर्गातून कोण उभे केलेले योग्य ठरेल याची गोळाबेरीजही अनेकांनी करून ठेवली होती. प्रभागात कोणत्या पक्षाची ताकद व हवा आहे याचा अंदाज बांधत, प्रसंगी उडी मारण्याची तयारी ठेवून असलेल्या इच्छुकांनी राजकीय हवामान पाहून दोन महिन्यांपासून पक्षांतरही केले. विशेष करून भाजपा व शिवसेनेकडेच अशा इच्छुकांचा ओढा असल्यामुळे व निवडणुकीच्या तोंडावर दररोज आयाराम येत असल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांना ताकद दाखविण्याची संधीच या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने मिळाली. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून ऐनवेळी प्रवेशकर्त्या झालेल्यांनाच महत्त्व प्राप्त झाले, त्यातून पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी एकेका प्रभागात आठ ते दहा इच्छुकांची भर पडली. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुकांमधून उमेदवार निश्चित करताना पक्षाची अडचण झाली खरी, परंतु त्याचबरोबर बंडखोरीच्या भीतीने पक्षाने उमेदवारी देण्यासाठी सर्वच इच्छुकांची अखेरच्या क्षणापर्यंत परीक्षा पाहिली. उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या क्षणी काहींच्या हातात पक्षाचे एबी फॉर्म सोपविण्यात आल्याने इच्छुकांचे पक्षांतर सत्कारणी लागल्याची भावना व्यक्त करण्यात आली, परंतु या एबी फॉर्मची तांत्रिक पूर्तता न करण्यात आल्याने, तर काहींना फॉर्मची रंगीत झेरॉक्स एबी फॉर्म म्हणून देण्यात आल्याने त्यांचे अर्ज छाननीत बाद ठरले. अर्ज बाद होणाऱ्यांमध्ये आयारामांची संख्याच सर्वाधिक असल्याने त्यांची अवस्था ‘दैव देते, कर्म नेते’ अशीच झाली आहे.