मेजर गोगोर्इंना पद्मभूषण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 01:53 AM2017-05-25T01:53:56+5:302017-05-25T01:53:56+5:30
दगडफेकीपासून सैन्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरी आंदोलनकर्त्याला जीपवर बांधणारे मेजर लितुल गोगोई यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दगडफेकीपासून सैन्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरी आंदोलनकर्त्याला जीपवर बांधणारे मेजर लितुल गोगोई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करायला हवे असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बुधवारी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले.
गेल्या ९ एप्रिल रोजी श्रीनगर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीदरम्यान स्थानिक आंदोलनकारी सशस्त्र दलावर तुफान दगडफेक करीत होते. त्यावेळी मेजर गोगोई यांनी सैन्याचे रक्षण करण्यासाठी एका आंदोलनकर्त्याला पकडून जीपवर बांधले होते. त्यावर नंतर बरीच टीका झाली होती, पण गडकरी यांनी मेजर गोगोई यांची प्रशंसा केली. आंदोलनकर्त्याला जीपवर बांधणे रणनीतीचा भाग होता. दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी आंदोलनकर्त्याचा ढालीप्रमाणे वापर करण्यात आला. गोगोई यांनी प्रसंगावधान दाखवून आपल्या सैन्याचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला गेला पाहिजे असे गडकरी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उत्तर-पूर्व भागातील राज्ये व जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्यास्तरावर विकासकामे करण्यात आली आहेत. गेल्या ५० वर्षांमध्ये या क्षेत्रात एवढी विकासकामे कधीच झाली नाही असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.