‘खूप बदमाश लोक आहेत ते, माझे मम्मी-पप्पा मला द्या’; चिमुकल्या स्वातीचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 07:13 PM2017-12-07T19:13:49+5:302017-12-07T19:21:01+5:30

ट्रॅक्टरचा धक्का बांबूला लागल्याने तो तुटला पप्पा त्यांना समजविण्यासाठी गेले मात्र, त्यांनी भांडण करीत पप्पा आणि मम्मीचे पाय ओढत डोक्यावर लोखंडी पाईपने मारले. माझ्या मागे धावले मी घाबरून घरात घुसले, ते  मम्मी-पप्पांना मारतच होते.

'Give me my parents, they are very bad men'; Tihuukya Swati Taha | ‘खूप बदमाश लोक आहेत ते, माझे मम्मी-पप्पा मला द्या’; चिमुकल्या स्वातीचा टाहो

‘खूप बदमाश लोक आहेत ते, माझे मम्मी-पप्पा मला द्या’; चिमुकल्या स्वातीचा टाहो

Next

परतवाडा (अमरावती) : ट्रॅक्टरचा धक्का बांबूला लागल्याने तो तुटला पप्पा त्यांना समजविण्यासाठी गेले मात्र, त्यांनी भांडण करीत पप्पा आणि मम्मीचे पाय ओढत डोक्यावर लोखंडी पाईपने मारले. माझ्या मागे धावले मी घाबरून घरात घुसले, ते  मम्मी-पप्पांना मारतच होते. मला माझे मम्मी-पप्पा पाहिजे, असा टाहो चिमुकल्या स्वातीने फोडला अन् उपस्थित शेकडोंचे डोळे पानावले. गोविंदपूर येथे बुधवारी रात्री हल्ल्यात मृत पावलेल्या लिल्लारे दाम्पत्यावर हजारोंच्या उपस्थितीत गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात आले. 

चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर जवळपास दीड हजार लोकवस्तीचे खेडे.  शिरजगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया गोविंदपुरात बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान कैलास उत्तमराव लिल्लारे (४५), पत्नी गीता (४०) यांची काका रतन (४०), मदन (३८) व जगन प्रेमलाल लिल्लारे (३६, सर्व रा. गोविंदपूर) यांनी अतिशय क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीच्या डोक्यावर लोखंडी पाईपने प्रहार करून हत्या केली. शिरजगाव पोलिसांनी फिर्यादी अंकुश सोपान रणगिरे (२४, रा. अकोली जहागीर, ता. अकोट) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या ३०२, ३४ अन्वये  आरोपींना तत्काळ अटक केली.
हातभर बांबू तुटण्याचे निमित्त-
आरोपी हे मृत लिल्लारे दाम्पत्यांचे चुलत काका आहेत. दोघांची घरे आजुबाजूला. दोघांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी मुरुम आणणा-या ट्रॅक्टरचा धक्का लागून कुंपणाचा वेळू तुटला. त्यावरून पुढे दाम्पत्याचे मुडदे पाडले गेले. 

क्रौर्याचा कळस
लिल्लारे पती-पत्नी खाली कोसळेपर्यंत क्रूरकर्म्यांनी पाईपने सतत वार केले. रक्तबंबाळ दाम्पत्य बचावासाठी याचना करीत होते. परिसरातील नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही.  जन्मदात्यांवर हल्ला होताना चिमुकली स्वातीही मदतीसाठी किंचाळत होती, मात्र व्यर्थ !

अन् स्वाती बचावली
दोघांची हत्या केल्यावर तिन्ही आरोपींनी मोर्चा स्वातीकडे वळविला. ती घरातच अंधारात लपून बसली. घरात घुसून त्यांनी मिळेल त्या दिशेने लोखंडी पाईप फिरविले. मात्र आपण हुंदके गिळत गप्प पडून राहिल्याने ते घराबाहेर गेल्याचे स्वातीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ट्रॅक्टर चालक गोपाल पारीसे आणि लिल्लारेंच्या घरी पाहुणा म्हणून आलेला अंकुश रणगिरे मिळेल त्या वाटेने पळत सुटल्याने बचावले.

हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
गोविंदपूर नजिकच्या हिंदू स्मशान भूमित नि:शब्द वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत लिल्लारे दाम्पत्यावर गुरूवारी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  कैलास लिल्लारे यांना दोन मुली आहेत. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. मोठी मुलगी व मुलगा तारूबांदा येथे आजोबांकडे राहतो. ‘स्वाती’ एकटीच आई-वडिलांसोबत राहत होती.

आरोपींना पोलीस कोठडी
चांदूरबाजार न्यायालयाने तिन्ही आरोपींना गुरुवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींनी हत्येसाठी वापरलेले लोखंडी पाईप, रक्ताने माखलेले कपडे, इतर साहित्य पोलिसांनी जप्त करवयाचे आहे. ट्रॅक्टर जप्त केले आहे, अशी माहिती ठाणेदार मुकूंद कवाडे यांनी दिली.

Web Title: 'Give me my parents, they are very bad men'; Tihuukya Swati Taha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.