‘मेट्रो स्थानकाला बाळासाहेबांचे नाव द्या’
By Admin | Published: May 21, 2017 03:12 AM2017-05-21T03:12:39+5:302017-05-21T03:12:39+5:30
पश्चिम द्रुतगती मार्गावर उभारण्यात येत असलेल्या दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्गावरील जोगेश्वरी येथील मेट्रो रेल्वे स्थानकाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावर उभारण्यात येत असलेल्या दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्गावरील जोगेश्वरी येथील मेट्रो रेल्वे स्थानकाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर’ असे नाव देण्यात यावे, अशा आशयाचा लेखी प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठविण्यात आला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे मेट्रो-३ हा भुयारी मार्ग उभारण्यात येत असून, उर्वरित मेट्रो मार्गांचे बांधकाम प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. दहिसर ते डी.एन.नगर हा मेट्रो प्रकल्प प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असून, या मार्गावरील एक स्थानक जोगेश्वरी येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर’ मनपा रुग्णालयाजवळ येत आहे. या मनपा रुग्णालयाजवळच उभारण्यात आलेल्या जोगेश्वरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलासही ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल’ असे नाव देण्यात आले आहे. परिणामी, या दोन्ही ठिकाणी मेट्रोचे स्थानक येत असल्याने स्थानकाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनी एमएमआरडीएकडे पाठविला आहे.
दरम्यान, येथील मेट्रो रेल्वे स्थानकाला ‘जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शन’ (जे.व्ही.एल.आर.) असे नाव देण्यात येणार आहे.