दुधाला ३५ रुपये प्रतिलिटर खरेदी दर द्या, दूध संघांना राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 06:09 AM2023-06-23T06:09:56+5:302023-06-23T06:10:13+5:30
पुणे : राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर ३० रुपये इतक्या कमी दराने दूध खरेदी करतात. दूध ...
पुणे : राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर ३० रुपये इतक्या कमी दराने दूध खरेदी करतात. दूध संघांनी हा खरेदी दर किमान ३५ रुपये प्रतिलिटर इतका करावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तसेच, दूध संघांच्या व्यवस्थापनाच्या खर्चाचा ही अभ्यास करून नफ्याचा हिस्सा उत्पादकांना मिळावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करील, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी दिली.
विखे यांनी राज्यातील सर्व दुग्ध सहकारी संस्थांची बैठक पुण्यात घेतली. त्यानंतर बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील गाईच्या दुधाचे दर मध्यंतरी कमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांनी दर वाढवण्याची मागणी केली होती. दूध खरेदी दर हा राज्यात एकसारखा असावा आणि तो ३५ रुपये लिटर देण्यात यावा, अशी या बैठकीत चर्चा झाली.
पशुखाद्य दरात २५ टक्के दर कमी करण्याचे निर्देश
पशुखाद्य दरामध्ये २५ टक्के दर कमी करण्याचे संबंधित कंपन्यांना आम्ही निर्देश दिले आहेत, त्यामुळे पशुखाद्य
कमी दरात मिळून उत्पादन खर्च कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरण्याचा सरकारचा विचार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला.
लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना लसीचा दुसरा डोसही मोफत देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पशुवैद्यकीय डिप्लोमा आता बारावीनंतर
राज्यात यापुढे बारावीनंतर तीन वर्षांचा पशुवैद्यकीय डिप्लोमा सुरू करण्यात येईल. नागपूरच्या पशुवैद्यकीय विद्यापीठामार्फत त्याची अंमलबजावणी होईल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
दुधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्का
दुधातील भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणारे आणि तसे दूध स्वीकारणाऱ्या संस्थांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे, अशी यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे भेसळखोरांवर छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.