उपमुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात केंद्रात मंत्रिपद द्या - शिवसेना
By Admin | Published: November 6, 2014 10:16 AM2014-11-06T10:16:17+5:302014-11-06T10:16:17+5:30
राज्यात उपमुख्यमंत्रीपद देत नसाल तर केंद्रात आणखी एका मंत्रिपद द्या अशी मागणी शिवसेनेने भाजपाकडे केल्याचे समजते.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - राज्यात उपमुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर भाजपाने केंद्रात आणखी एक मंत्रिपद द्यावे अशी मागणी शिवसेनेने केल्याचे समजते. शिवसेनेच्या या मागणीमुळे भाजपाचीही कोंडी झाली असून आता यावर भाजपा शिवसेनेपुढे नमते घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपा आणि शिवसेनेमधील चर्चेचे गु-हाळ अद्यापही सुरुच असून युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. शिवसेनेला राज्यात उपमुख्यमंत्रीपद व ९ ते १० मंत्रिपद हवे आहे. तर भाजपाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सध्या शिवसेनेची दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांनी राज्यात उपमुख्यमंत्रीपद देत नसाल तर केंद्रात आणखी एक मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून रविवारी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विस्तारामध्ये आपल्या पदरात एखादे मंत्रिपद पाडून घ्यावे अशी रणनिती शिवसेनेने आखल्याचे सूत्रांनी सांगितले. तर भाजपाने याविषयावर शिवसेनेला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. शिवसेनेेची मागणी मान्य केल्यास तेलगू देसम, अकाली दल हे पक्षही भविष्यात अशी मागणी करु शकतील अशी भिती भाजपा नेत्यांना वाटत आहे.