...फक्त 20 मिनिटं वेळ द्या, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचं नामदेव शास्त्रींना भावनिक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 06:29 PM2017-09-27T18:29:36+5:302017-09-27T18:34:48+5:30
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे असतानाच आता पंकजांनीही नामदेव शास्त्रींना भावनिक साद घातली आहे.
मुंबई - दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे असतानाच आता पंकजांनीही नामदेव शास्त्रींना भावनिक साद घातली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींना पत्र लिहून 20 मिनिटांचा वेळ मागितला आहे.
या पत्रात पंकजा मुंडे लिहितात, आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते. लोकांची तळमळ पाहून कोणी मध्यस्थी नको म्हणून मीच विनंती करते, शेवटी मी लहानच आहे. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा. काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. ते पुन्हा कोयता घेऊन राबायला जातील, त्यांना ऊर्जा मिळते. मी आतापर्यंत कोणापुढे झुकले नाही, मात्र समाजासाठी नतमस्तक होते. मला दिवाळीची माहेरची भेट द्या. पंकजा मुंडेंचं हे भावनिक पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथे झालेल्या दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीत पंकजा मुंडे समर्थकांनी महंत शास्त्री यांच्या ‘सुपारी’ची भाषा वापरली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. भगवान गडावर दस-याच्या दिवशी कोणताही राजकीय मेळावा होणार नाही, अशी ठाम भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतली होती. शास्त्री यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन गडावर राजकीय मेळाव्याला बंदी घालण्याची मागणीही केली होती. या पार्श्वभूमीवर मुंडे समर्थकांचा गडावरच मेळावा घेण्याचा आग्रह आहे. दसरा मेळावा कृती समिती स्थापन झाली असून, गावोगावी बैठका सुरू आहेत. पाथर्डी येथे बैठकीत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्याने महंत नामदेव शास्त्री यांच्याविरुद्ध सुपारीची भाषा वापरली होती. तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी गडावर अज्ञात लोकांचा वावर दिसल्याने पोलिसांनी गडावर बंदोबस्त वाढवला आहे. श्रीक्षेत्र भगवानगड हे सर्व जाती-धर्माच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तेथील भक्तांच्या भावना लक्षात घेता गडावर किंवा गडाच्या जागेत कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या भाषणास किंवा राजकीय सभेस परवानगी देऊ नये, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केलीय.
भगवानगड हे आमचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविकांना राजकीय भाषणांचा मेळावा नको आहे. मागील वर्षी याच कारणावरून हाणामा-या झालेल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती आता नको. याशिवाय कोणालाही उपोषणास बसण्याची परवानगी देऊ नये. महंतांची व गडाची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याची काळजी प्रशासनाने घ्यावी व राजकीय सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी खरवंडी कासार, मालेवाडी, ढाकणवाडी, काटेवाडी, मिडसांगवी, भारजवाडी, कीर्तनवाडी, पिंपळगव्हाण आदी गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.