पुण्याच्या डम्पिंग ग्राउंडसाठी पर्याय द्या! - उच्च न्यायालय
By admin | Published: October 21, 2015 02:48 AM2015-10-21T02:48:02+5:302015-10-21T02:48:02+5:30
पुणे शहरासाठी उरळी देवाची फुरसुंगी हे एकुलते एक डम्पिंग ग्राउंड आहे. ते बंद केले, तर शहराची काय अवस्था होईल, याची कल्पना केली आहे का, असा प्रश्न खंडपीठाने राज्य सरकारला केला.
मुंबई : पुणे शहरासाठी उरळी देवाची फुरसुंगी हे एकुलते एक डम्पिंग ग्राउंड आहे. ते बंद केले, तर शहराची काय अवस्था होईल, याची कल्पना केली आहे का, असा प्रश्न खंडपीठाने राज्य सरकारला केला. पुणे महापालिकेला डम्पिंग ग्राउंडसाठी अतिरिक्त किंवा पर्यायी जागा देण्याचा विचार करा, अन्यथा तसे आदेश देऊ, असे न्यायालयाने खडसावले.
डम्पिंग ग्राउंडसाठी जागा अपुरी असल्याने अतिरिक्त जागा मिळावी, यासाठी पुणे महापालिकेने २०१०मध्ये सरकारच्या तिजोरीत सुमारे ४ कोटी रुपये जमा केले. मात्र, राज्य सरकारने महापालिकेला पर्यायी किंवा अतिरिक्त जागा दिली नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने याबाबत तत्काळ विचार करावा, अन्यथा पुढील सुनावणीच्या वेळी आम्हीच तसे आदेश देऊ, असे न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने म्हटले.
पुणे महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन, २०००मधील नियमांचे पालन किती कालावधीत करणार, हे स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीच्या वेळी दिले. (प्रतिनिधी)