‘पी अॅण्ड टी’ला पाणी द्या
By admin | Published: April 4, 2017 04:26 AM2017-04-04T04:26:13+5:302017-04-04T04:26:13+5:30
शहरातील पी अॅण्ड टी कॉलनीत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे.
डोंबिवली : शहरातील पी अॅण्ड टी कॉलनीत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यावर तोडगा काढण्याची विनंती तेथील गंगा सोसायटीतील रहिवाशांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि केडीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांना केली होती. त्यावर म्हात्रे यांनी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना तातडीने जलवाहिनी दुसरीकडे हलवून पाणी देण्यासंदर्भात सूचना दिली आहे.
म्हात्रे यांनी सांगितले की, केडीएमसीच्या ई प्रभागाचे पाणीपुरवठा उपअभियंता योगेंद्र राठोड यांनी गंगा सोसायटी परिसरातील सध्याची जलवाहिनी कुठून जाते याची पाहणी केली आहे. मात्र केवळ एका सोसायटीची जलवाहिनी कशी अन्यत्र जोडायची?, असे कारण सांगत राठोड यांच्यासह उपअभियंता एकंडे टाळाटाळ करत असल्याची टीका ज्ञानेश्वर गाईगोळे यांनी केली.
गाईगोळे म्हणाले की, म्हात्रे सकारात्मक असताना महापालिकेचे अधिकारी डोळेझाकपण का करतात? लोकप्रतिनिधींच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. पण येथे परिस्थिती उलट आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हात्रे प्रयत्नशील असूनही अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा आभाव आहे.
दरम्यान, आता कुठे मार्च सरला असून, टँकरद्वारेच पाणीपुरवठा होत असल्याचे अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे येथील हजारो रहिवाशांना पालिकेच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. ही स्थानिक लोकप्रतिनिधींची शोकांतिका आहे. त्यावर तातडीने उपाययोजना होत नसतील तर त्यांनी ठिय्या आंदोलन करावे. रहिवासी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे गाईगोळे म्हणाले. (प्रतिनिधी)
>टँकर मिळतोय
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे महापालिकेकडून गंगा सोसायटीला दिवसाआड तर जशी गरज पडेल, तसा एक टँकर मिळत आहे.
खासदारांच्या पत्राला तेवढी दाद महापालिकेचे अधिकारी देत आहेत, असे गाईगोळे यांनी सांगितले. म्हात्रे यांच्या भूमिकेबद्दलही रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.