संरक्षण दलात महिलांना समान संधी देणार
By admin | Published: October 12, 2015 05:08 AM2015-10-12T05:08:31+5:302015-10-12T05:08:31+5:30
देशाच्या संरक्षण दलात महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांना समान संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले
मुंबई : देशाच्या संरक्षण दलात महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांना समान संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले. १९६५ सालच्या युद्धात वीरमरण पत्करलेल्या लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांच्या ५० व्या स्मृतिप्रीत्यर्थ माटुंग्याच्या वेलिंगकर एज्युकेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पर्रिकर म्हणाले की, ‘आई आणि वडील डॉक्टर असतानाही गुप्ते यांनी संरक्षण दलात जाण्याचा निर्णय घेतला. १९६५ सालच्या युद्धात वयाच्या २३व्या वर्षी त्यांनी पाकिस्तानात जाऊन पूल उडवला आणि त्यांना वीरमरण आले. गुप्ते यांच्या बलिदानामागील भावना आयोजकांनी जमेल तितक्या शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवायला हवी, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी त्यातून प्रेरणा घेऊन संरक्षण दलाकडे वळतील.’
कडक उन्हाळा, मुसळधार पाऊस आणि गोठवून टाकणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीतही सैनिक देशाचे रक्षण करतात. मात्र, सैनिकांच्या पराक्रमांच्या आठवणी आपण केवळ डायरीमध्ये जतन करून ठेवतोय का? अशी शंका मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे गुप्ते राहणाऱ्या परिसरातील ले. दिलीप गुप्ते मार्ग परिसर मंडळाने पुढाकार घेऊन गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या या पराक्रमाची आठवण जपल्याचा आनंदही पर्रीकर यांनी व्यक्त केला.
यावेळेस शहीद गुप्ते यांचे लहान भाऊ डॉ. राजन गुप्ते यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात संरक्षण दलातून मिळणाऱ्या शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणाचे कौतुक केले. कामगिरीवर जाण्याआधी भावाने लिहिलेल्या पत्राची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वयाच्या २३ व्या वर्षी इतकी प्रगल्भता दलाच्या प्रशिक्षणातूनच आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात ले. दिलीप गुप्ते यांच्यावर लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन पर्रिकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ले. दिलीप गुप्ते मार्ग परिसर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश हडकर, वुई स्कूलचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, डॉ. राजन गुप्ते, डॉ. पुष्पा जयवंत उपस्थित होत्या.
या वेळेस रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास पेडणेकर, बालमोहन विद्या मंदिरचे प्राध्यापक गुरूप्रसाद रेगे आणि गिरीश रेगे यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)