ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 02:02 PM2022-10-20T14:02:21+5:302022-10-20T14:05:55+5:30
Raj Thackeray : राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुंबई : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे. अशातच परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. यात ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा.
सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि सध्या कोरडवाहू तसंच बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
याचबरोबर, दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती, असेही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtrapic.twitter.com/BsjqkGJWTY
— Raj Thackeray (@RajThackeray) October 20, 2022
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
मागील आठ दिवसापासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात नदी नाले दुधडी भरुन वाहत आहेत. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे. अशातच परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस
राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 123 टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या तब्बल 23 टक्के अधिक पाऊस जास्त झाला आहे. गेल्या 50 ते 60 वर्षात बंगालच्या उपसागरात जास्त वादळे निर्माण होत होती, पण गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात वादळाचे प्रमाण वाढले आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे परिणाम सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे राज्यासह किनारपट्टीच्या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त वाढल्याचे दिसून येत आहे.