दोन दिवसांत आरक्षण द्या, नाहीतर तुमचा निकाल लावू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:46 AM2018-11-29T06:46:53+5:302018-11-29T06:47:11+5:30
मराठा क्रांती मूक मोर्चाचा अल्टिमेटम : १ डिसेंबरपासून आंदोलन जाणार समाजाच्या हाती
मुंबई : ‘दोन दिवसांत मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करा, नाहीतर तुमचा निकाल लावू,’ असा इशारा देत मराठा क्रांती मूक
मोर्चाने सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, तसेच १ डिसेंबरपासून मराठा आरक्षणाचे आंदोलन समाजाच्या हाती जाईल, असा सूचक इशाराही समन्वयकांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत टिकेल असे आरक्षण सरकारला द्यावे लागेल. तोपर्यंत संवाद यात्रेच्या रूपात आलेले कार्यकर्ते आझाद मैदानात ठिय्या देणार आहेत. मात्र, सरकारने वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन समाजाच्या हाती जाईल. त्यानंतर, समाजच सरकारचा निकाल लावेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिली गुरुवारची डेडलाइन
गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी शासनाचा एकही प्रतिनिधी आला नसल्याचा रोष मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनात आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप मदत मिळाली नसल्याची खंत समन्वयकांनी व्यक्त केली.
याशिवाय आंदोलनात ज्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते तत्काळ मागे घेण्याची मागणी ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे. मराठा आरक्षण देण्याची तारीख वारंवार पुढे ढकलत वाद निर्माण केला जात आहे. तरी २९ नोव्हेंबरला आरक्षणाची घोषणा केली नाही, तर ३० तारखेपासून विधानभवनात घुसून राज्यकर्त्यांचे कपडे फाडण्याचा इशारा ठोक मोर्चाच्या काही समन्वयकांनी दिला आहे.