मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 08:01 AM2021-06-01T08:01:43+5:302021-06-01T08:02:16+5:30

पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती देऊन मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली.

Give Rs 3000 crore package to Maratha community says bjp mp narayan rane | मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

Next

ठाणे : महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती देऊन मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली.

यावेळी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुती सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले. 

सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता. सरकारने खटला चालविण्यास टाळाटाळ करून तारखा मागितल्या. गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही. त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज झाला, असा आरोप राणे यांनी केला.

राणे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा उपाय हातात आहे, परंतु सरकारने तसे केलेले नाही. 

केंद्र सरकारने मात्र १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट होण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. घटना दुरुस्तीनंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल, असेही राणे यावेळी म्हणाले . 

फडणवीस -पवार भेट अराजकीय
देंवद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट अराजकीय आहे. यापूर्वी मीदेखील पवार यांना भेटलो असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले. 
या भेटीमुळे कोणाची प्रकृती बिघडणार असेल, तर त्यांनी औषध घ्यावं, इंजेक्शनदेखील उपलब्ध आहे, अशी टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी सोडून इतर सर्व पक्ष आम्ही जाऊ असे म्हणतात. 
राष्ट्रवादी मात्र कोणीही येऊ दे आम्ही सरकारमध्ये असणार, असे म्हणत असल्याची खिल्ली त्यांनी उडविली. सरकार स्थिर नाही, ते केव्हाही पडेल, असा पुनरुच्चार राणे यांनी केला.

Web Title: Give Rs 3000 crore package to Maratha community says bjp mp narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.