एक्स्प्रेस गाड्यांना सुरक्षा द्या
By admin | Published: February 24, 2015 04:23 AM2015-02-24T04:23:44+5:302015-02-24T04:23:44+5:30
रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे गाड्यांना कायमस्वरूपी सुरक्षारक्षक देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी रेल्वेला दिले़
मुंबई : रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे गाड्यांना कायमस्वरूपी सुरक्षारक्षक देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी रेल्वेला दिले़
भाविका मेहता या महिला प्रवाशाची पर्स एका चोराने रेल्वे प्रवासात चोरली़ या चोराचा पाठलाग करताना भाविकाला अपघात झाला़ याची नुकसानभरपाई मिळवण्यासाठी भाविकाने अॅड़ उदय प्रकाश वारूंजीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे़
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने रेल्वेला रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षारक्षक देणार की नाही? याचे प्रतिज्ञापत्र करण्याचे आदेश गेल्या सुनावणीला रेल्वेला दिले होते़ त्यानुसार सोमवारी रेल्वेने काही ठरावीक रेल्वे गाड्यांना सुरक्षारक्षक देणार असल्याचे न्यायालयाला सांगितले़ त्यावर न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली़ ठरावीक रेल्वे गाड्यांना सुरक्षारक्षक देणे म्हणजे इतर प्रवाशांवर अन्याय करण्यासारखे आहे़ सर्व रेल्वे गाड्यांना सुरक्षारक्षक देण्यात यावे, असे आदेश दिले. (प्रतिनिधी)